मुक्ताईनगर तालुक्यातील तरोडा येथील खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 06:09 PM2019-05-15T18:09:23+5:302019-05-15T18:11:18+5:30
पानटपरीवर होत असलेल्या गर्दीच्या वादातून दाखल केलेली केस मागे घ्यावी या कारणावरून खून करणाऱ्या ज्ञानेश्वर पंडित खोडे (कोळी) याला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.पी.डोरले यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
भुसावळ, जि.जळगाव : पानटपरीवर होत असलेल्या गर्दीच्या वादातून दाखल केलेली केस मागे घ्यावी या कारणावरून खून करणाऱ्या ज्ञानेश्वर पंडित खोडे (कोळी) याला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.पी.डोरले यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचप्रमाणे दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील तरोडा येथे ३ सप्टेंबर २०१५ रोजी ही घटना घडली होती. हा निकाल सुनावण्यात आला त्यावेळी मयत प्रमोद पाटील यांची पत्नी, सासरे हेही उपस्थित होते.
तरोडा येथील प्रमोद निना पाटील यांनी त्यांच्या घराच्या जवळच पानटपरी टाकली होती. या टपरीवर गर्दी होत होती. त्यांच्याशेजारी राहणारा ज्ञानेश्वर खोडे याला गर्दीचा राग येत असे. त्यामुळे ज्ञानेश्वर व त्याचे भाऊ सोपान खोडे तसेच मयत प्रमोद पाटील यांच्यात वाद होत होता. यासंदर्भात प्रमोद पाटील यांनी ज्ञानेश्वरविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्यादही दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा मागे घ्यावा, असे ज्ञानेश्वरचे म्हणणे होते. ३ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी साडेआठला प्रमोद पाटील हा बैलगाडी जुपत होता. तेव्हा ज्ञानेश्वरने प्रमोदच्या मानेवर मागून कुºहाडीने वार केला. यात डाव्या कानाच्या खाली, मानेवर तसेच डोक्याच्या मागील बाजूस गंभीर मार लागला होता. यावेळी शेजारीच राहणारे महादेव सीताराम डाबेराव, सोपान गजमल पाटील व सोपान कडू पाटील हे प्रमोदच्या घरात धावत गेले व त्यांची पत्नी सविता प्रमोद पाटील हिला हकीगत सांगितली. त्यावेळी सविता ही घटनास्थळी धावत आली. पती प्रमोद पाटील यास रक्ताच्या थारोळ्यात तिने पाहिले व लागलीच जखमी अवस्थेत एका वाहनातून मुक्ताईनगर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी प्रमोद पाटील याना मयत घोषित केले, अशी फिर्याद मयत प्रमोद पाटील यांच्या पत्नी सविता पाटील यांनी मुक्ताईनगर पोलिसांना दिली होती. यावरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात १३२/१५, भादंवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारी वकिलांनी तपासले साक्षीदार
या गुन्ह्यात सरकारी वकील विजय खडसे त्याचप्रमाणे फिर्यादीचे वकील मनीषकुमार वर्मा, अॅड. विजयालक्ष्मी मुत्याल, अॅड. सचिन कोष्टी यांनी तपासाधिकारी तथा पीएसआय हेमंत कडुकार, फिर्यादी सविता पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण काकडे यांच्यासह आठ साक्षीदार तपासले. सर्व साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
सरकारतर्फे अॅड.खडसे, फिर्यादीतर्फे अॅड.वर्मा, अॅड. मुत्याल व अॅड. कोष्टी यांनी काम पाहिले, तर आरोपीतर्फे अॅड.पी.आर. पाटील यांनी बाजू मांडली.
न्यायाधीश एस.पी.डोरले यांनी निकाल सुनावला. त्यावेळी मयत प्रमोद पाटील यांची पत्नी व फिर्यादी सविता पाटील, मयताचे सासरे रामभाऊ नथू पाटील ( लोहारखेडा ) व महादेव सीताराम डाबेराव आदी उपस्थित होते.
सविता पाटील रहात आहे वडिलांकडे
मयत प्रमोद पाटील यांच्या पश्चात पत्नी सविता (वय ३५), मुलगा सागर (वय १५) व आकाश (वय ८) असा परिवार आहे, तर प्रमोद यास तीन भाऊ आहेत.
प्रमोद पाटील यांचा खून झाला तेव्हापासून त्यांची पत्नी सविता ही दोन्ही मुलांसह माहेरी मुक्ताईनगर तालुक्यातीलच लोहारखेडा येथे वडील रामभाऊ पाटील यांच्याकडे रहात आहे. मोठा मुलगा सागर हा इयत्ता दहावीमध्ये तर आकाश इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे.
वडिलांचा खून झाला. त्यावेळी मोठा मुलगा सागर हा सहावीमध्ये शिकत होता, तर आकाश हा चौथीमध्ये शिकत होता, अशी माहिती सविता पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.