लग्नाला विरोध होणार म्हणून जळगावला प्रेमीयुगुलाने संपविली जीवनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 05:28 PM2018-01-23T17:28:42+5:302018-01-23T21:33:32+5:30
कुटुंबातून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे गृहीत धरुन धावत्या रेल्वेखाली तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही मृतदेहाची सोमवारी रात्री उशिरा ओळख पटली. इंद्रदत्त रमेश गोडबोले (वय २२) व रुपाली माणिक पवार (वय २०) दोन्ही रा.मेहरुण तलाव परिसर, जळगाव) असे या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२३ : कुटुंबातून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे गृहीत धरुन धावत्या रेल्वेखाली तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही मृतदेहाची सोमवारी रात्री उशिरा ओळख पटली. इंद्रदत्त रमेश गोडबोले (वय २२) व रुपाली माणिक पवार (वय २०) दोन्ही रा.मेहरुण तलाव परिसर, जळगाव) असे या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
मेहरुण तलाव परिसरातील रहिवासी
सावखेडा शिवारात सोमवारी सकाळी साडे सात वाजता रेल्वे लाईनवर या तरुण-तरुणीचे मृतदेह आढळून आले होते. फोटो, ओळखपत्र व ओळख पटेल अशी अन्य कोणतीच वस्तू मृतदेहाजवळ नसल्याने ओळख पटविण्यात अडचणी आल्या होत्या.कॉन्स्टेबल मोतीलाल पाटील यांनी व्हॉटस्अॅपवर या तरुण-तरुणीचे फोटो व्हायरल केल्यानंतर मेहरुण तलाव परिसरात राहणारे तरुण व तरुणी गायब झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पाटील हे हेडकॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे व उमेश भांडारकर यांना सोबत घेऊन मेहरुण तलाव परिसरात गेले असता तेथील झोपड्यांमध्ये राहणारा इंद्रदत्त व रुपाली हे रात्रीपासून घरी नसल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांना दोघांचे फोटो दाखविले असता त्यांनी त्यांना ओळखले. तरीही खात्री करण्यासाठी मंगळवारी सकाळी दोघांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आले. तेथे कपडे व चेंदामेंदा झालेल्या चेहºयावरुन त्यांची ओळख पटली.
शौचास जाण्याचे सांगून पडले घराबाहेर
रुपाली ही रविवारी रात्री ९ वाजता शौचास जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबाने शोधाशोध केली, मात्र कुठेही शोध लागला नाही. परंतु, त्याचवेळी इंद्रदत्त हा देखील घराबाहेर पडल्याचे लक्षात आले. दोघांच्या प्रेमप्रकरणाची चाहूल असल्याने हे परत येतील किंवा कुठे तरी पळून गेले असावे अशी शंका आल्याने दोघांच्या नातेवाईकांनी शोध थांबविला होता. त्यानंतर सोमवारी रात्री फोटो घेऊन घरी पोलीसच धडकल्याने दोघांच्या कुटुंबाने एकच आक्रोश केला.