उभं आयुष्य गेलं पण इतकी महागाई नाही पाहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 07:03 PM2021-02-06T19:03:21+5:302021-02-06T19:04:55+5:30
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दुपारी अचानक नगरपालिका चौकात एकत्रित येत रस्त्यावर चूल पेटवून केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीचा निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : उभे आयुष्य गेले पण आजच्या इतकी महागाई नाही पाहिली. मोदींच्या ‘अच्छे दिन’मध्ये खायचे काय व जगावे कसे, हेच समजत नाही, अशी भावना येथील ८० वृद्ध महिला जनाबाई सपकाळ यांनी बोलून दाखविली. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक नगरपालिका चौकात एकत्रित येत रस्त्यावर चूल पेटवून केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीचा निषेध केला. यावेळी सपकाळ तेथे पोहचल्या व त्यांनी भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी महिलांचे असे काही आंदोलन होईल, याची पुसटशीही कल्पना कुणाला नव्हती. अचानक जमा झालेल्या कार्यकर्त्या महिलांनी रस्त्यावर चूल पेटवून स्वयंपाक करायला सुरुवात केली. नागरिक गोळा झाले. उत्सुकतेपोटी काय चालले हे पाहण्यासाठी गर्दी जमली. पोलिसांना समजताच तेही आले. ‘मोदीजी नहीं चाहिये अच्छे दिन, लौटा दो हमारे बुरे दिन’, ‘वाढलेला गॅस कोंडतोय सर्वसामान्यांचा श्वास’अशा घोषणांचे फलक महिलांनी हातात घेतले होते.
जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, प्रदेश सचिव वंदना चोधरी, डॉ. ईश्वरी राठोड, मनीषा गव्हारे, जयश्री पाटील, दिव्या पाटील, कोमल पाटील, मीनाक्षी चव्हाण, जनाबाई सपकाळ आदी महिला उपस्थित होत्या.