प्रकाशा सूर्यसंकाशा
By Admin | Published: May 6, 2017 01:56 PM2017-05-06T13:56:36+5:302017-05-06T13:56:36+5:30
राम दंडकारण्यात असताना त्यांनी तापीकाठी यज्ञ केला
ऑनलाइन लोकमत
प्रकाशाचा उल्लेख नाना पुराणांमधून सार्थकपणे डोकावतो. थेट रामायण आणि महाभारतार्पयत यांचे संदर्भ पोहोचलेले आहेत. श्रीराम आणि अश्वत्थामा यांचे उल्लेख प्रकाशाभोवती फेर धरून नाचताना आपल्याला आढळतात. राम दंडकारण्यात असताना त्यांनी तापीकाठी यज्ञ केला. चिरंजीवी अश्वत्थामा अजूनही शाप भोगत या परिसरात हिंडतोय. सातपुडय़ाच्या द:या खो:यांमधून भटकतोय. शिवाची नाना तीर्थे प्रकाशाला गवसणी घालून आहेत. ‘प्रकाशा सूर्यसंकाशा’ असा महिमा या प्रदेशाचा आहे. वाराणसीहून अधिक मोल या तीर्थाला लाभले. याचे कारण म्हणजे ‘शिवमहिमA’ स्तोत्रकर्ते पुष्पदंतेश्वरांचे या भागात असलेले मंदिर होय. तापी, गोमती आणि पुलिंदा या तीन नद्यांच्या संगमावर वसलेले संगमेश्वर आणि तापीच्या दक्षिण तीरावरचे सिद्धेश्वर ही मुख्य देवळे.
सूर्यकन्या तापीचा उल्लेख स्कंदपुराण, वायुपुराण, मत्स्यपुराण, ब्रrांडपुराण आणि मरकडेयपुराणातही येतो. महाभारताच्या आदीपर्वात तापीचा इतिहास आलाय. विविध कल्पांमध्ये तापीची विविध नावे आढळतात. तापीस एकवीस कल्पांची माता मानले जाते. सूर्याचे दोन पुत्र -यम आणि शनी. पुत्रांनी पित्यापासून ताप उचलला. सूर्यदेवाला दोन कन्या - तापी आणि यमुना. कन्यांनी मात्र पित्यापासून तपाची परंपरा जोपासली. तापी या प्रदेशाची जीवनधारा आहे. मध्य प्रदेशातील बैतूल येथे तापीचा उगम होतो. ती महाराष्ट्राच्या सीमांना स्पर्श करत गुजरातेत सुरतेला सागरात विलीन होते. तापी आंतरभारतीचे एक भावस्वप्न जोपासताना दिसते. लोकजीवन म्हणजे पर्यावरण, तापी लोक जीवनाचे प्रकाशतीर्थ आहे. आलोकतीर्थ आहे.
तापीकाठ हा नेहमी पुरांच्या तडाख्यात सापडणारा प्रदेश. सतत पुराने उद्ध्वस्त होण्याचा शाप जणू काही या भूप्रदेशाला मिळालेला आहे, यामुळे अनेकदा इथल्या गावांचे स्थलांतर व्हायचे. प्रकाशा मात्र अजूनही हलवले गेले नाही, याचे कारण इथला भूगोल होय. उत्खननावरून मात्र या स्थानाचे स्थलांतरण झाले असल्याचे ध्यानात येते. उत्खननात भांडी, नाणी, कौले, विटा, मातीची मडकी आणि नक्षीकाम केलेली हत्यारे सापडली. यावरून या प्रदेशाचे दळणवळण बुद्धपूर्र्व काळापासून उत्तर प्रदेशाशी असावे, असे वाटते. इंग्रजांच्या आगमनापूर्वी प्रकाशा हे कापड विणण्याचे केंद्र होते.
केदारेश्वर मंदिराच्या परिसरात शीलालेख आहेत, हा सोळाव्या शतकातला आहे. या परिसरात आणखी शीलालेख आढळतात. खानदेशावर आभीर राजांचे साम्राज्य होते, त्यावर पुढे मराठे व राजपुतांची सत्ता आली. गुजर्र बंधूंनीही पश्चिमेकडे वसाहत केली. प्रकाशा येथे दहाव्या शतकार्पयतच्या मूर्ती विद्यमान आहेत. प्राचीन काळी हे गाव नंदुरबार तोरणमाळ मार्गावर होते. पेशवाईत या गावाला आणखी वैभव लाभले. खानदेशातली मराठय़ांचे कर्तबगार सरदार होते कदमबांडे. त्यांचे कोपर्ली, रनाळे येथे ठाणी होती, त्यांनी या तीर्थक्षेत्रात नवी भर घातली. या परिसरात अन्यत्र अनेक शिवमंदिरे आहेत, ती मुलखगिरी करताना धारातिर्थी पडलेल्या किंवा एरवीच कालवश झालेल्या कदमबांडे घराण्यातल्या पुष्कळ आणि इतरही मराठा पुरुषांच्या छत्र्या होत. तिसरा शीलालेख संगमेश्वराच्या मंदिरात आहे. वडगावच्या कमलोजी कदमांच्या वंशमणी श्री रघुजी राजाने शके 1667 आणि संवत 1802मध्ये संगमालय बांधले. खानदेशातले कदमबांडय़ांच्या मुलूखगिरीचे आणि वैभवाचे स्मारक म्हणून या शीलालेखांचे महत्त्व आहे. केदारेश्वर मंदिरासमोरची दीपमाळ कंठोजी कदमबांडे यांनी बांधली.
श्रीरामप्रभू दंडकारण्यात असताना त्यांनी प्रकाशा इथे एक महायज्ञ केला होता. आजही त्या स्थानावर एक टेकडी दिसते, ती भस्माची टेकडी म्हणून ओळखली जाते. मंदिरे आपल्या संस्कृतीच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा घटक आहे. विनोबांनी प्रकाशाचे महात्म्य गाताना असे म्हटले होते की, प्रकाशा म्हणजे प्रयाग आणि काशी होय. प्रकाशाला दक्षिण काशी म्हणून गौरविले जाते. परकाशी म्हणजे प्रकाशा. काशीयात्रा झाल्यावर भाविकजन गंगेची कावडं घेऊन संगमस्थळी येतात. हे तीर्थ भारतात महत्त्वाचे असल्याची मान्यता आहे. काशीची प्रतिमा म्हणूनही या नगरीला प्रकाशा, असे नामाभिधान लाभले. दक्षिण काशी अशी मान्यता लाभली. या परिसरात शेकडोंनी शिवमंदिरे आहेत. दक्षिण भारतातील हे एक महत्त्वाचे क्षेत्र.
सिंहस्थ पर्वणीमुळे या स्थानाचे महत्त्व विशिष्ट ठरले आहे. या परिसरातील केदारेश्वर, पुष्पदंतेश्वर, संगमेश्वर, सिद्धेश्वर ही मंदिरे महत्त्वाची आहेत. सिंहस्थात गौतमी तीरावरच्या गौतमेश्वराच्या मंदिरावर ध्वजारोहण होते, हा ध्वजपर्वणी काल असतो.
- प्रा.डॉ. विश्वास पाटील