प्रकाशाजवळ दोन तरस आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 01:14 AM2017-01-04T01:14:44+5:302017-01-04T01:14:44+5:30
प्रकाशा : गावानजीक दोन तरस आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रकाशा : गावानजीक दोन तरस आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाºयांनी येथे भेट देऊन पायाच्या ठश्यांची पाहणी केली असता ते तरसाचे असल्याचे सांगितले.
याबाबत वृत्त असे की, प्रकाशा गावाजवळ तळोदा रस्त्यावर गावाला लागून मजुरांचे तात्पुरते वास्तव्य आहे. त्यातील दोन मजूर अमोल रामदास बोराणे व राजू गजानन घोडके हे रात्री १० वाजेच्या सुमारास शौचासाठी गेले असता त्यांना दोन तरस आल्याचे जाणवले. त्यांनी तेथून पळ काढून ट्रॅक्टरचे लाईट चालू केल्यानंतर ते राजाराम रमेश चौधरी यांच्या उसाच्या शेतात घुसले. याबाबत या मजुरांनी जवळच असलेल्या शिव जलधाराचे मालक प्रकाश पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे वंतू गावीत व मणिलाल पाडवी यांनीही तेथे भेट देऊन वनविभागाला कळवले. वनक्षेत्रपाल ए.जे. पवार, वनपाल व्ही.टी. पदमोर यांनी सायंकाळी प्रत्यक्ष पाहणी करून पायाच्या ठश्यांचे फोटो काढल्यानंतर ते तरसाचे असल्याचे सांगितले.
दरम्यान, मजुरांना आढळून आलेला प्राणी तरस की बिबट्या याबाबत दोघांच्या मनात शंका असल्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(वार्ताहर)