दिव्याच्या अवयव दानाने सात रुग्णांच्या जीवनात प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 01:50 PM2020-12-31T13:50:29+5:302020-12-31T13:51:10+5:30
दिव्या लुनावत यांची खंडित झालेली आयुष्याची दोर आज एक नव्हे तर सात जणांच्या जीवनात जगण्याची नवी उमेद दिली आहे.
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : आजोबांचे देहदान, मामींनी केले नेत्रदान आणि दुर्दैवाने घरात पडल्यामुळे ब्रेन डेड झालेल्या नातीचे डोळे, यकृत, मूत्रपिंड आणि त्वचा दान दिल्याने तब्बल सात रुग्णांना जीवन जगण्याची नवीन उमेद देणाऱ्या मुक्ताईनगर येथील जैन कुटुंबाची नात आणि जळगाव येथील डॉ.आचालिया यांची कन्या सिडको (नाशिक) येथील लुनावत कुटुंबाची सून दिव्या लुनावत यांची खंडित झालेली आयुष्याची दोरी आज एक नव्हे तर सात जणांच्या जीवनात जगण्याची नवी उमेद दिली आहे.
अवयव दान हेच श्रेष्ठ दान होय. समाजातील चालीरीती व प्रवाहाविरुद्ध जाऊन प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण मरणोत्तर अवयव दानातून इतरांच्या जीवनात जगण्याची संधी देण्याचा वसा घेतलेल्या मुक्ताईनगरचे माजी सरपंच चंपालाल चांदमल (रेदासनी) जैन यांच्या कुटुंबातील परंपरा नातीनेही पुढे नेली आहे. या कौतुकास्पद कार्यात दिव्या यांच्या शरीरातील अवयवातून जीवन दान लाभलेले सात रुग्ण आणि त्यांचे कुटुंबच नव्हे तर समाजमन ही अवयव दानाच्या आदर्श कार्याचे कौतुक करीत ऋण व्यक्त करीतआहे.
घरात पडल्याने ब्रेन् हॅमरेज
नाशिक सिडको परिसरातील रहिवासी अरिहंत ज्वेलर्सचे संचालक लालचंद लुनावत यांची सून व नीलेश लुनावत यांची पत्नी तसेच जळगाव शहरातील मानराजपार्क येथील रहिवाशी डॉ.प्रकाशचंद आचालिय यांची मुलगी, मुक्ताईनगर येथील कापड व्यापारी अजित चंपालाल जैन यांची भाची दिव्या नीलेश लुनावत (वय ४३) यांना ब्रेन हॅमरेज असल्याने त्यांच्या मेंदूतून रक्तस्त्राव झाला व त्या अचानक कोमात गेल्या दिव्या लुनावत या घरातच पडल्याने मेंदूतून आणि रक्तस्त्राव होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मानवी अवयव दान कायदा १९९४ च्या शासकीय नियमावलीनुसार रुग्णाला ब्रेन स्टेन डेड कमिटीने मेंदू मृत घोषित केले. दिव्या यांंच्या आयुष्याची दोर खंडित झाली. त्यांच्या अवयव दानातून इतरांच्या जीवनात प्रकाश देण्याचा निर्णायक कार्य
त्याचे कुटुंब लुनावत परिवार तसेच समाज बांधवांनी घेतला.
सात रुग्णांच्या जीवनात प्रकाश
यानंतर अशोक मेडिकव्हर हॉस्पिटलच्या पुढाकाराने दिव्या यांचे अवयव दान करण्यात आले. मूत्रपिंड, यकृताचा एक भाग, दोन डोळे व कर्करोग झालेल्या तीन रूग्णांना त्वचा असे एकूण सात अवयव इतर रुग्णांना मिळाले. त्यामुळे त्या सात रुग्णांना जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे आणि दिव्याच्या अवयव दानामुळे त्यांच्या जीवनात प्रकाश मिळाला.
अवयव दानाचा वसा
वैद्यकीय सेवेची पार्श्वभूमी असलेल्या दिव्या यांच्या माहेरमध्ये वडील डॉक्टर, मामा डॉ.प्रसन्न रेदासनी, मामभाऊ डॉ.यशपाल जैन हे वैद्यकीय सेवेत कार्यरत आहे त.
दिव्या ह्या मुक्ताईनगर येथील जैन (रेदासनी) कुटुंबियांची नात असून, त्यांचे आजोबा स्व.चंपालाल जैन यांनी सहा वर्षांपूर्वी देहदान केले व मामी स्व.निर्मलादेवी अजित जैन यांनी पाच वर्षांपूर्वी नेत्रदान असे मरणोपरांत अवयव दान केले आहे.