अखंड लागलीसे ज्योती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 09:14 PM2018-11-04T21:14:58+5:302018-11-04T21:15:46+5:30

अविवेक सटकला की विवेक प्रकाशमान झालाच समजा

Lightning flashed ... | अखंड लागलीसे ज्योती...

अखंड लागलीसे ज्योती...

Next

मी अविवेकाची काजळी । फेडुनि विवेक दीप उजळी ।
तै योगिया पाहे दिवाळी । निरंतर ।।
माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज भगवतांच्या अवताराच्या प्रयोजनापर श्लोकावर निरुपण करत आहेत. ‘संभवामि युगे युगे’ हा तो सुप्रसिद्ध श्लोक. धर्माला ग्लानी येते म्हणजे काय? तर विवेकरुपी दिव्यावर अविवेकाची काजळी चढते. ती काजळी म्हणजे हा विवेकदीप पूर्ववत प्रज्वलीत होतो. तो विझलेला नसतोच पण अविवेकाच्या काजळीने नुसता मिणमिणत असतो. फक्त अविवेक सटकला की विवेक प्रकाशमान झालाच समजा. मग योग्यांच्या हृदयात प्रस्फुरित झालेला हा ज्ञानप्रकाश म्हणजे त्यांची दिवाळीच म्हणावी. लौकीक दिवाळीचे प्रकाशपर्व वर्षातून चार-सहा दिवसांपुरतेच येते. पण योग्यांची ही दिवाळी म्हणजे निरंतर ज्ञानाच्या प्रकाशाचा अविरत उत्सव.
न कळे दिवसराती । अखंड लागलीसे ज्योती ।। असा या निरंतर दिवाळीचा अनुभव संत तुकाराम महाराजांना आला. ज्ञानाची ही दिवाळी आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी संत महात्मे अविरत जागे असतात. ‘सूर्ये अधिष्ठिली प्राची । जगा राणीव हे प्रकाशाची । तैम्ही वाचा श्रोतया ज्ञानाची । दिवाळी करी ।। असे माऊली सांगत आहेत. आपल्या दारी लावलेले दिवाळीचे दिवे बाहेरचा अंधार दूर करतील. पण अंतकरणातल्या अंधाराचे काय? तिथे कोणता दिवा लावणार? विवेक जागा करणं हाच एक उपाय आहे. त्यावर त्यासाठीच संत महात्माचा अवतार आहे. अज्ञान अंहकार दूर करण्याची माझी क्षमता नाही- त्यासाठी मला संतांना शरण गेलं पाहिजे.
आज आपण पाहतो क्षणभराचा अविवेक अनेकांचे संसार उद्धवस्त करतो. भावनावेशात विवेक हरपतो. बाहेर आनंदाचा देखावा सुरू आहे. सुखाच्या साधनांची, वस्तुंची रेलचेल आहे. वस्तू ठेवायला घरात जागा नाही. पण घरात राहणाऱ्या माणसांच्या मनीचा संकोच झालेला एकमेकांशी संवाद नाही. परस्परावर विश्वास नाही. सर्वांनीच मुखवटे धारण केलेले, खरा चेहरा कुणालाच दिसत नाही. अशा भवतालात आपण राहतो आहोत. संताच्या या शिकवणुकीनुसार आपण हा विवेकदीप उजळला तरच खºया अर्थाने ज्ञानाची दिवाळी आपल्याला साजरी करता येईल.

-प्रा. सी.एस.पाटील, धरणगाव.

Web Title: Lightning flashed ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.