जळगावात हनुमान मंदिरावर वीज कोसळली, खेळणारी मुलं बालंबाल बचावली
By सुनील पाटील | Updated: June 15, 2024 17:34 IST2024-06-15T17:34:13+5:302024-06-15T17:34:57+5:30
पावसात विजांचा कडकडाट होऊन पिंप्राळ्यातील शंकरअप्पा नगरातील कष्ट भंजन वीर हनुमान मंदिरावर वीज कोसळली.

जळगावात हनुमान मंदिरावर वीज कोसळली, खेळणारी मुलं बालंबाल बचावली
जळगाव : शहरात शनिवारी दुपारी चार वाजता सुरु झालेल्या पावसात विजांचा कडकडाट होऊन पिंप्राळ्यातील शंकरअप्पा नगरातील कष्ट भंजन वीर हनुमान मंदिरावर वीज कोसळली. यात कळसाचे नुकसान झाले तर मंदिराच्या भींतीला मोठे छिद्र पडले. याचवेळी मंदिरात दहा ते बारा मुले खेळत होती. दैव बलवत्तर म्हणून या मुलांना कुठलीच दुखापत झाली नाही. मोठ्या आवाजामुळे मुले प्रचंड घाबरली होती.
शहरात शनिवारी साधारण तासभर मुसळधार पाऊस झाला. पिंप्राळ्यात ४ वाजून ११ मिनिटांनी विजांचा कडकडाट झाला व त्याचवेळी मंदिरावर वीज कोसळली. यावेळी मोठा आवाज होऊन उजेड पडले होते. शनिवार असल्याने दिवसभर मंदिर खुले ठेवले जाते. याच मंदिरात ५ वी ते १० पर्यंत शिक्षण घेत असलेले प्रणव पाटील, रोहित पाटील, चिराग सपकाळ, कार्तिक पाटील, ओम पाटील, हर्षल फुलपगारे, जय वाघ, दर्शन वाघ व पार्थसह अन्य १० ते १२ मुले खेळत होती. वीज कोसळल्यानंतर आवाज ऐकून नागरिक घरातून बाहेर निघाले. माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद सोनार, रघुनाथ पाटील, शंकर पाटील, प्रताप पाटील, पांडूरंग जाधव, डॉ. कैलास पाटील, मयुर कापसे यांनी धाव घेऊन पाहणी केली.
मूर्ती अन् मुले सुरक्षित
मंदिरावर वीज कोसळली असली तरी हनुमानाची मूर्ती व खेळणारी मुलं सुरक्षित आहेत. देवाची कृपा म्हणूनच सर्व जण सुरक्षित राहिले. मोठी दुर्घटना या ठिकाणी टळली आहे. या घटनेनंतर पालकांनी आपल्या मुलांना कवेत घेतले. या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. सिमेंटचा कळस पुर्णपणे तुटला आहे तर त्यालाच लागून मोठे छिद्र पडले आहे.