भुसावळ तालुक्यातील खडका येथे वीज उपकेंद्राला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 11:07 PM2018-11-10T23:07:18+5:302018-11-10T23:08:22+5:30
भुसावळ तालुक्यातील खडका येथील ४०० के.व्ही. सबस्टेशनमध्ये शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजेचा दाब नियंत्रित करणाऱ्या रिॅअॅक्टरचा स्फोट झाल्याने ही आग लागली.
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील खडका येथील ४०० के.व्ही. सबस्टेशनमध्ये शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजेचा दाब नियंत्रित करणाऱ्या रिॅअॅक्टरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. अग्नीशमन दलाच्या चार-पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर सायंकाळपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीमुळे अकोला, कोराडी, औरंगाबाद येथील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धस्तरावर काम करीत होते.
दरम्यान, आगीत किती नुकसान झाले याबाबत अद्यापही समजू शकत नसल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक नेहते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, तर अकोला, कोराडी, औरंगाबाद येथील काही भागातील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
खडका येथील ४०० केव्ही सबस्टेशनमध्ये दुपारी १२ वाजता नवीन ट्रान्सफार्मरची विधिवत पूजा करण्यात येवून कार्यान्वित करण्यात आला. मात्र अवघ्या एक तासातच या ट्रान्सफार्मच्या आॅईल गळतीमुळे त्याचा स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की, यामुळे संपूर्ण गावाला हादरा बसला व आकाशात धुराचे लोट दिसत होते. या ट्रान्सफार्मरचे एक-दिड वर्षापासून दुरुस्तीचे कामकाज सुरू होते. टेस्टींगनंतर तो कार्यान्वित करण्यात आला होता. झालेल्या भयानक स्फोटामुळे सबस्टेशनच्या यार्ड परिसरातील लाखो रुपयांची केबल व गवताने पेट घेतला. यामुळे आगीने रुद्र रुप धारण केले होते. या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आकडा समोर आला नसला तरी अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीवर दीपनगर, भुसावळ नपा, फैजपूर पालिकेच्या सात बंबांनी आगीवर तब्बल चार ते पाच तासांनी नियंत्रण मिळविले.
सबस्टेशनमधील विजेचा दाब नियंत्रित करणाºया रिअॅक्टरला प्रथम आग लागली असावी, यातून ही आग पुढे वाढली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.