लाइनमनचा सोनाळ्याच्या जंगलात विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 10:57 PM2021-02-08T22:57:48+5:302021-02-08T22:58:35+5:30
तुटलेली जंप विद्युतपोलवर जोडताना राजेंद्र प्रकाश पवार (४२) यांना विजेचा धक्का बसल्याने जागीच अंत झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पहूर, ता जामनेर : सोनाळा, ता. जामनेर येथील जंगलात तुटलेली जंप विद्युतपोलवर जोडताना राजेंद्र प्रकाश पवार (४२) यांना विजेचा धक्का बसल्याने जागीच करुण अंत झाल्याची घटना घडली आहे. लक्षात न आल्यामुळे पोलवर खूप वेळ मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र प्रकाश पवार (गारखेडा, जामनेर) येथील रहिवासी असून पहूर येथील वीज वितरण उपविभागीय ग्रामीण कार्यालय कक्ष-२ येथे लाइनमन (वरिष्ठ तंत्रज्ञान) पदावर कार्यरत आहे. पवार सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सोनाळा जंगलात ११ के.व्ही. लाइनच्या पोलवर तुटलेली जम्प टाकण्यासाठी एकटेच गेले. पोलवर चढण्यापूर्वी त्यांनी परमिट घेऊन पुरवठा खंडित केल्याचे उपकार्यकारी अभियंता व्ही.डी. सोनवणे यांनी सांगितले आहे. पोलवर जम्पजोडणी चालू असताना क्राॅस (विरुद्ध) वीजपुरवठा आल्याने पवारचा या धक्क्याने जागेवर मृत्यू ओढवल्याचे सांगण्यात आले.
शाॅर्टसर्किट झाले अन् जंगल भडकले...
घटना घडल्यानंतर सोनाळा भागाकडील जंगलात शाॅर्टसर्किटने आग लागली, याची माहिती वनरक्षक प्रसाद भारुडे, वनपाल संदीप पाटील, अशोक ठोमरे यांना मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले व जंगलात आग विझविल्यानंतर आग लागण्याचे कारण शोधत असताना या अधिकाऱ्यांना पोलवर मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी अनिल राठोड, प्रदीप चौधरी, गोपाळ गायकवाड व ज्ञानेश्वर बाविस्कर दाखल झाले. घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद जामनेर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येणार असून शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे केल्याचे पहूर पोलिसांनी सांगितले आहे. पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार असून पवार यांची परिस्थिती हलाखीची असल्याचे सहकाऱ्यांनी सांगितले आहे.