सोशल मीडियावर दिग्गज नेत्यांची नावे जोडली आर्थिक व्यवहाराशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:52 PM2020-07-28T12:52:31+5:302020-07-28T12:53:04+5:30

नोकर भरती प्रकरण : जिल्हा सहकारी बँकेकडून सर्व आरोपांचे खंडण

Linked names of veteran leaders on social media to financial transactions | सोशल मीडियावर दिग्गज नेत्यांची नावे जोडली आर्थिक व्यवहाराशी

सोशल मीडियावर दिग्गज नेत्यांची नावे जोडली आर्थिक व्यवहाराशी

Next


जळगाव : जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्यांच्या मार्फत आर्थिक व्यवहार करीत जिल्हा सहकारी बँकेची नोकर भरती करण्यात आल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या नेत्यांची थेट नावे घेण्यात आली असून पात्र उमेदवारांना डावलल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, ही क्लिप ज्या परीक्षार्थीची आहे, त्याने यासंदर्भात माफिनामादेखील लिहून दिला असून संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शकपणे झाली असल्याचे सांगत सर्व आरोपांचे जिल्हा बँकेच्यावतीने खंडण करण्यात आले आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या भरती प्रक्रिया खाजगी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आली. यामध्ये ९० गुणांची लेखी परीक्षा आणि १० गुणांची तोंडी मुलाखत असे स्वरुप होते. या भरती प्रक्रियेसंदर्भात छावा संघटनेमार्फत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली. या सोबतच सोशल मीडियावरदेखील या भरती प्रक्रियेची एक क्लिप व्हायरल झाली आहे.
परीक्षार्थीने दिला माफिनामा
सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर या परीक्षार्थीने जिल्हा बँकेकडे माफिनामादेखील लिहून दिला आहे. मानसिक त्राग्यातून मी बोललो असून संंबंधिताने बोलणे रेकॉर्ड केले व सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे या परीक्षार्थीचे म्हणणे आहे, असे जिल्हा बँकेच्यावतीने सांगण्यात आले. तसेच छावा संघटनेनेदेखील केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. अशा प्रकारामुळे पात्र उमेदवारही तणावात येत असल्याने त्यांच्याकडूनही या प्रक्रियेबाबत खात्री करता येऊ शकते, असा दावाही बँकेने केला आहे.

आर्थिक व्यवहारासंदर्भात आरोप
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये परीक्षा दिलेल्या एका परीक्षार्थ्याने माहिती अधिकार कार्यकर्त्याशी संपर्क साधत भरती प्रक्रियेच्या अंतिम यादीविषयी चर्चा केली आहे. तसेच मुलाखतीला गेलो त्या वेळी (एका दिग्गज नेत्याचे नाव घेत) मला जात विचारण्यात आल्याचे परीक्षार्थीचे म्हणणे आहे. तसेच नोकरीसाठी १८ लाख रुपये ‘रेट’ असून १० लाख रुपये फायनल असल्याचे सांगण्यात आल्याचे हा परीक्षार्थी माहिती अधिकार कार्यकर्त्याला सांगतो. माझ्याकडे पैसे नाही, मला माहिती अधिकारात याची माहिती मिळवायची असून ती कोठून मिळवावी, असे विचारतो. त्यावर माहिती अधिकार कार्यकर्ता माहिती अधिकारात अर्ज टाका, असा सल्ला देतो. तसेच पुढे १० लाख रुपये कोणी मागितले, असे विचारतो. त्यावर या परीक्षार्थीने थेट राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या दिग्गज नेत्यांचे नाव घेत त्यांचे माणसे असल्याचे सांगतो. यावर आपल्याला स्टे आणायचा असल्याचे सांगितल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ता त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देण्याचा सल्ला देतो. त्यानंतर परीक्षार्थी भेट घेण्याविषयी सांगतो, त्यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता मी उद्या बाहेर गावी जात असल्याने भेट होऊ शकणार नसल्याचे सांगतो. मात्र दोन-तीन दिवसांनंतर आपण भेटू असे परीक्षार्थी पुन्हा सांगतो. त्यावर माहिती अधिकार कार्यकर्त्याने लेखी तक्रार करण्याचा पुन्हा सल्ला दिला. असा हा संवाद वाढत जाऊन त्यात थेट दिग्गजांचे नावे घेण्यात आली.

पारदर्शक भरती प्रक्रिया
या भरती प्रक्रियेत सहकार क्षेत्राच्या निर्देशानुसार गुणांची विभागणी होती. नामांकित संस्थेकडून कायदेशीररित्या संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. क्लिपमधील आरोप असो की छावा संघटनेने केलेले आरोप असो, हे सर्व खोटे आहे. सर्व प्रक्रिया पारदर्शक झाली आहे.
- जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा बँक, जळगाव.

Web Title: Linked names of veteran leaders on social media to financial transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.