अनेर नदीच्या डोहात बुडून लिपिकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 08:26 PM2019-07-27T20:26:32+5:302019-07-27T20:41:37+5:30
अनेर नदीत पुलाखालील डोहात बुडून नीलेश अशोक गायकवाड (वय ३४) यांचा मृत्यू झाल्याची घटना २७ जुलै रोजी दुपारी घडली.
चोपडा, जि.जळगाव : अनेर नदीत पुलाखालील डोहात बुडून नीलेश अशोक गायकवाड (वय ३४) यांचा मृत्यू झाल्याची घटना २७ जुलै रोजी दुपारी घडली.
येथील पुरवठा विभागातील लिपिक नीलेश गायकवाड, अव्वल कारकून रवींद्र नेतकर आणि रेशन दुकानदार मधुकर राजपूत, अरुण पाटील तसेच तहसील कार्यालयातील रोजंदारी कर्मचारी इजाज शेख, शशिकांत पाटील, मुकेश पाटील, रेशन विभागाचे बाबू जैन यांच्यासह १० जण २७ जुलै रोजी सकाळी चोपडा येथून ताजोद्दीन बाबा यात्रेसाठी निघाले होते. रस्त्यातच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सीमारेषेवर असलेल्या अनेर नदीवरील पुलावर सर्वजण थांबले. त्यातील लिपिक नीलेश गायकवाड, अव्वल कारकून रवींद्र नेतकर, मुकेश पाटील हे पुलाखाली नैसर्गिक विधीसाठी नदीत उतरले होते. मात्र नीलेश गायकवाड यांचा पाय घसरल्याने नदीत असलेल्या डोहात ते बुडाले. त्यांना बाहेर काढण्यासाठी मुकेश पाटील हे डोहात उतरले. मात्र दोनजण बुडत असल्याचे पाहून सोबत असलेले अरुण पाटील यांनी डोहात उडी घेतली व मुकेश पाटील यांचे शर्ट पकडून त्यांना बाहेर काढले. तर लेश गायकवाड यानाही वाचविण्याचा प्रयत्न अरुण पाटील यांनी केला. मात्र दुर्दैवाने ते डोहात बुडाले. नाकातोंडात पाणी गेल्याने ते बेशुद्ध झाले. त्याच स्थितीत गायकवाड व इतरांना वरला, ता.सेंधवा, जि.बडवाणी (मध्य प्रदेश) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र नीलेश यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतरांवर उपचार करण्यात आले.
गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी या घटनास्थळाकडे निघाल्या होत्या. घटनास्थळी निवडणूक नायब तहसीलदार राजेश पऊळ, अव्वल कारकून सुरेश पाटील, सतीश बोरसे, सेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील हे गेले आहेत. तर तहसीलदार अनिल गावीत हे गायकवाड यांचे शव ताब्यात घेण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत प्रयत्नात होते.