तरल, वास्तववादी कवी मनाने घडवली माझ्यातील ‘मी’ची अनोखी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 02:23 AM2019-06-09T02:23:46+5:302019-06-09T02:24:06+5:30
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत कवयित्री तथा जळगाव मू.जे. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा.संध्या महाजन...
बालपणापासून भजन, कीर्तनाची ओढ असणारे, कितीतरी अभंग तोंडपाठ असणारे आजोबा, निरक्षर असून प्रत्येक प्रसंगावर चार ओळी जुळवून गुणगुणत आयाबायांमध्ये आनंद पेरणारी लक्ष्मी आजी यांचा सहवास लाभलेला. त्यातच माध्यमिक शाळेत असतानाच कविता वाचन आणि गायनाची बीजं आमच्या खिर्डी हायस्कूलच्या जया इंगळे आणि उषा पाटील बाईंनी मनात रूजवलेली होती. ‘मुलगी झाली हो’सारख्या नाटकातील सहभाग, कथाकथनात येणारा प्रथम क्रमांक अशा गोष्टी साहित्याकडे मनाला खेचत गेल्या. भरपूर कविता वाचल्या, चालीत गायल्या, शाबासकी मिळवली. स्वत:साठी आणि मैत्रिणींसाठी भाषण तयार करणं ही त्या बालवयातील माझी खरी लेखनाची सुरवात.
अध्यापन क्षेत्रात आल्यानंतर विविध मासिकं, अंकांमधून माझं वेगवेगळ्या विषयांवर लेखन, संशोधनात्मक लेखन, संपादित ग्रंथात लेख, दिवाळी अंकात लेख लिहिणं सुरू होतं, परंतु माझ्यातील ‘मी’ची खरी ओळख दिली ती माझ्या कवितेने.
निखळ बाल्यावस्थेतील प्रत्येक खळखळती आठवण, तारूण्याच्या उंबरठ्यावरील मैत्रिणींचे ते रूसवे-फुगवे, ते मैत्रीचे ते आनंदोत्सव या साऱ्या गोष्टी मनात रूंजी घालत होत्या.
जीवनातील सुख-दु:ख, चढ-उतार, समाजजीवनाचे धगधगते वास्तव, दुर्लक्षित घटकांचे असहाय्य जगणे, माणसांचे खरेखोटे व्यवहार पाहून मन विषण्ण होत होते. सृष्टीतील अनाकलनीय घटना, घडामोडी, सृजनाचे आविष्कार, सृष्टीसौंदर्य, निसर्गाचे चमत्कार या साºया गोष्टींनी मन प्रफुल्लित होत होतं. एकाच वेळी मनाचे शब्दांभोवती रूंजी घालणे, अस्वस्थ होणे, प्रफुल्लित होणे या साºया संमिश्र भावनांनी बालपणात पेरले गेलेले ते काव्यप्रतिभेचे बीज अंकुरत गेले आणि एकेका वेगळ्या आशयाच्या कवितेचा जन्म होत गेला. प्रत्येक काव्य आविष्कारानंतर आत्मविश्वास दुपटीने वाढत गेला. जगणे तेच रोजचे होते, पण आता ते नवनवीन, आनंददायी वाटू लागले. प्रत्येक घटनेत एक विषय दिसू लागला आणि जे जे मनाला भावले, ज्याने मन उद्विग्न केले, आनंदले ते ते सारे कवितेत उतरत गेले. त्यात मायेची माणसे होती, प्रेमाचा पाझर होता.
भावनांची उत्कटता होती, भक्तीभाव होता, सुख-दु:खाचे घुमारे होते. बालमनाचे रंजक खेळ होते. नानाविषयांनी माझी कविता बहरत गेली. वाचकांच्या, रसिकांच्या मनाला आनंद देणारी कविता नाना प्रतिक्रिया घेऊन येत गेली आणि माझ्यातील ‘मी’ मला हळूहळू हळूहळू गवसत गेले. माझ्या कवितेचे पहिले वाचक आणि श्रोते होते माझे वडील आणि वहिनी.
एम.ए.च्या वर्गाला लोकसाहित्य विषय शिकवताना कविता आणि लोकगीतांचा विविध अंगाने अभ्यास सुरू असताना ग्रामीण बाज, देशी शब्दचापल्य, लय, ताल या साºया गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण माझ्या कवितेची उंची वाढवत गेले. विविध जनसंपर्क साधनांद्वारे लवकर वाचकवर्गापर्यंत, काव्यप्रेमींपर्यंत कविता पोचली आणि माझ्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाचे ‘काव्यसंध्या’चे पदार्पण साहित्य क्षेत्रात झाले.
मनाचे विविध खेळ मांडणारी साहित्य कृती आकाराला येत असताना होणाºया सुखद काव्यप्रसव वेदना अनुभवताना होणारा आनंद खरंच शब्दातीत असतो आणि हे निर्विवाद सत्य आपल्यातील आपलीच खरी ओळख घडवून देत असतो, असे माझ्या कवीमनाने मान्य केले आहे.
-प्रा.संध्या महाजन, जळगाव