दारू विक्रेत्यानेच अडकविले पोलिसाला एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:32+5:302021-06-24T04:12:32+5:30
जळगाव : अवैध धंदे चालक व पोलीस यांच्यातील संबंध लपून राहिलेले नाहीत. अशाच एका अवैध दारू विक्रेत्याने पोलीस ...
जळगाव : अवैध धंदे चालक व पोलीस यांच्यातील संबंध लपून राहिलेले नाहीत. अशाच एका अवैध दारू विक्रेत्याने पोलीस अंमलदार व होमगार्डची विकेट घेतली आहे. दारू विक्रीच्या व्यवसायावर कारवाई करू नये यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पाळधी दूरक्षेत्राचा पोलीस अंमलदार किरण चंद्रकांत सपकाळे (वय ३७, रा. संत मीराबाई नगर, पिंप्राळा) व होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे (वय २५, रा. सोनवद, ता. धरणगाव) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी पाळधी दूरक्षेत्रातच रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदसर, ता. धरणगाव येथील ५५ वर्षीय तक्रारदार याचा गावात अवैध गावठी दारू विक्रीचा व्यवसाय आहे. दारू अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करू नये तसेच तक्रारदारावर दाखल असलेल्या गुन्ह्यातील वॉरंटमध्ये मदत करावी यासाठी धरणगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पाळधी दूरक्षेत्राचा अंमलदार किरण सपकाळे याने अडीच हजार रुपयांची मागणी केली होती. या दारू विक्रेत्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश भामरे यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यानुसार भामरे यांनी लाच मागणीची पडताळणी केली व बुधवारी पाळधी दूरक्षेत्रातच पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, नीलेश लोधी, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रवीण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ व महेश सोमवंशी यांना सोबत घेऊन सापळा रचला. होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे याने सपकाळे याच्या सांगण्यावरून अडीच हजार रुपये स्वीकारताच त्याला पकडण्यात आले. दोघांना अटक करण्यात आली असून, धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करून दोघांना जळगावात आणण्यात आले.