‘ड्राय डे’ला मद्यविक्री, ३५ जणांना अटक, सव्वा आठ लाखाचा मुद्देमाल जप्त
By विजय.सैतवाल | Published: November 5, 2023 08:05 PM2023-11-05T20:05:07+5:302023-11-05T20:05:30+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : चार परवानाधारक दुकानांवर विभागीय गुन्हा
जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ड्राय डे जाहीर केलेला असतानादेखील अवैधरित्य मद्यविक्री व वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करीत ३६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ३५ जणांना अटक केले आहे. एका जणांचा शोध सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ड्राय डे जाहीर केला. असे असतानाही मद्यविक्री सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भूकन यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार जळगावचे निरीक्षक लीलाधर पाटील, उप निरीक्षक शिवनाथ भगत, चाळीसगावचे निरीक्षक आर.जे. पाटील व त्यांचे सहकारी, भुसावळचे निरीक्षक सुजीत कपाटे व त्यांचे सहकारी, भरारी पथकाचे गोकूळ खंकरे व त्यांचे सहकाऱ्यांनी ठिकठिकाणी छापा टाकला. यात ३ व ४ नोव्हेंबर या दोन दिवसात ३६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यातील ३५ जणांना अटक करण्यात आली असून एका जणाचा शोध सुरू आहे.
या कारवाईच ८०६० लिटर रसायन, ७२८.५ लिटर गावठी दारु, २२६.९ लिटक देशी दारू, २३.४ लिटर विदेशी मद्य, ३९ लिटर बियर व एक चारचाकी आणि तीन दुचाकी असा एकूण आठ लाख २१ हजार ६४५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कालावधीमध्ये नियमभंग करणाऱ्या चार परवानाधारक दुकानांवर विभागीय गुन्हा नोंदविण्यात आला. यात एक देशी दारू दुकान, दोन बियर बार व एक बियर शॉपीचा समावेश आहे.