दारु विक्रेत्याने घराची जागा बळकावली, नांद्रा बुद्रूक येथील महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 05:31 PM2023-08-15T17:31:49+5:302023-08-15T17:32:05+5:30
दारु विक्रेत्याने गावातील रहिवासी महिलांवर हल्ला करुन त्यांची राहत्या घराची जागा बळजबरीने हिसकावून घेतली आहे.
जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रूक येथे दारु विक्रेत्याने रहिवासी महिलांची बळीजबरीने राहत्या घराची जागा हिसकावून त्याठिकाणी अवैधरित्या दारुचा व्यवयाय सुरु केला आहे. या दारु विक्रेत्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नांद्रा बुद्रूक येथील महिलांनी महाराष्ट्र राज्य शेतमजुरी युनियनच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार १५ ऑगस्ट रोजी सकाळपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.
दारु विक्रेत्याने गावातील रहिवासी महिलांवर हल्ला करुन त्यांची राहत्या घराची जागा बळजबरीने हिसकावून घेतली आहे, त्याठिकाणी अवैधरित्या दारुचा व्यवसाय करण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वारंवार ग्रामंपचायत, तालुका पोलीस स्टेशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारी तसेच निवेदन करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत दारु विक्रेत्यांवर कुठलीही कारवाई झालेली नाही.
सदर कुटुंब हे बेघर झाले असून संबंधित कुटुंब हे रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे सदर कुटुंबातील महिला जिल्हाधिकारी कार्यालसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. संबंधित जागा परत मिळावी, तसेच जागेवरील अतिक्रमण ग्रामपंचायत जोपर्यंत काढून संबंधित कुटुंबाला त्यांचे जागा परत मिळवून देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.