जळगाव जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर, हरकतींसाठी ५ डिसेंबरची मुदत
By अमित महाबळ | Published: December 4, 2023 08:16 PM2023-12-04T20:16:32+5:302023-12-04T20:16:41+5:30
जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली
अमित महाबळ
जळगाव : जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून, त्यावर हरकत घेण्यासाठी दि. ५ डिसेंबर रोजी, सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या हरकतींवर नंतर सुनावणी घेतली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापक व संस्था अध्यक्षांना एका पत्राद्वारे कळवले आहे.
या आधीच्या वेळापत्रकानुसार संस्था व शाळांकडून अतिरिक्त शिक्षकांची नावे प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली होती. त्यावर जिल्हास्तरावर सुनावणी घेण्यात येऊन सन २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांची अंतरिम यादी दि. ४ डिसेंबरला शिक्षण विभागातील सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आली आहे. वेतनपथक प्राथमिक आणि मुख्याध्यापक, खासगी प्राथमिक शाळा यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरदेखील ही यादी शेअर करण्यात आली आहे. या यादीमधील अतिरिक्त शिक्षकांना हरकत घेण्यासाठी दि. ५ डिसेंबर रोजी, सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यांनी लेखी हरकत कैलास ठोके, वरिष्ठ सहायक शिक्षण विभाग (प्राथमिक) तसेच शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेकडे दाखल करायची आहे. प्राप्त हरकतींवर दि. ७ रोजी दुपारी १ वाजता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या दालनात सुनावणी घेतली जाणार आहे. त्यासाठी संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक व संस्था अध्यक्ष किंवा प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
घोषित यादीमध्ये एखाद्या अतिरिक्त शिक्षकाच्या नावाचा समावेश करणे बाकी असेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दि. ५ रोजी विहित नमुन्यातील माहिती शिक्षण विभागात सादर करायची आहे. एखादा अतिरिक्त शिक्षक शाळेत कार्यरत राहिला, जाणिवपूर्वक त्याची माहिती लपवून ठेवली किंवा अतिरिक्त वेतनाचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी मुख्याध्यापक व संस्थाचालक यांची राहणार आहे, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.