समाजाला दिशा देणारे साहित्य हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन - प्रा.डॉ.किसन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 06:53 PM2019-09-22T18:53:11+5:302019-09-22T18:56:08+5:30
समाजाला दिशा देणारे साहित्य हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.किसन पाटील यांनी केले.
रावेर, जि.जळगाव : महाविद्यालयीन जीवनात वाङ्मय मंडळ हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा उपक्रम असून, लेखकाच्या अनुभूतीतूनच साहित्य आकाराला येते. कवयित्री बहिणाबाई चौधरी या निरक्षर असताना त्यांच्या नावाने विद्यापीठ नावारूपाला येणे ही अनन्यसाधारण बाब आहे. समाजाला दिशा देणारे साहित्य हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.किसन पाटील यांनी केले.
व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.व्ही. दलाल होते. प्रारंभी महाविद्यालयाच्या 'सातपुडा' या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ.किसन पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अधिसभा सदस्य प्रा.डॉ.ए.जी. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल राधा मनोहर पाटील व लीना प्रवीणकुमार मानकरे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.डॉ.गणपतराव ढेंबरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .
प्रमुख पाहुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा.डॉ.ए.जी.पाटील म्हणाले, साहित्य, समाज आणि संस्कृतीचा अभ्यास महत्त्वाचा असून समाजाची अभिरुची साहित्याच्या स्वरूपामुळे लक्षात येते. समाज जीवनाचे चित्रण साहित्य करते .
प्रास्ताविक प्रा ढोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.डी. धापसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.एस.बी. गव्हाड यांनी केले. स्वागत गीत लीना मानकरे हिने म्हटले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा.डॉ.जे.एम.पाटील, प्रा.एम.एस.पाटील, प्रा.डॉ.एस.जी.चिंचोरे उपस्थित होते.