साहित्य संमेलने : प्रतिभेची उर्जा स्थाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 04:09 PM2019-11-19T16:09:11+5:302019-11-19T16:09:29+5:30
खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे गेल्या आठवड्यात झाले. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक अशोक नीळकंठ सोनवणे यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत विविध अंगांनी घेतलेला आढावा.
या महिन्यात काही जिल्हास्तरीय साहित्य संमेलनांची रेलचेल जळगाव जिल्ह्यात दिसत आहे. काहींना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने हातभारही लावलेला दिसतो आहे. ग्रामीण भागात होणारी ही संमेलने नेमकी का आणि कुणासाठी भरवली जाताहेत?
मायमराठीचा हा जागर, तिच्या बोली भाषांसह चोपडा, पाचोरा, अमळनेर आदी ठिकाणी होतोय तो केवळ शब्दोत्सव नसून या संमेलनांमधून ज्येष्ठ सारस्वतांचं दर्शन आणि मार्गदर्शन नेटकं व्हावं, हा या मागचा उद्देश असतो.
सोबतच नव्याने लिहू लागलेल्या होतकरू हातांना उर्जा मिळावी, व्यक्त होण्याची संधी मिळावी, व्यासपीठ उपलब्ध व्हावं हाही हेतू असतो.
प्रशंसा, प्रतिसाद यांच्या अपेक्षेने अनेकदा नवागत लेखक अशा संमेलनांना उत्साहाने हजेरी लावतात. त्यांचा हिरमोड, उत्साहभंग होऊ नये, याचा विचार किती आयोजक करतात? एकतर निमंत्रितांची भाऊगर्दी शिवाय वेळ आणि नियोजन यांचा मेळ नसतो.
‘शहाणे करून सोडावे सकल जन’ एवढं थोर उद्दिष्ट या संमेलनांमधून अपेक्षित नसलं तरी मराठीची बऱ्यापैकी सेवा घडावी एवढी माफक अपेक्षा तर असूच शकते. संमेलनाध्यक्ष आणि विविध परिसंवादातील वक्त्यांकडून रसिकांप्रती काहीसं समाजभान असलेलं कल्याणकारी सांस्कृतिक संचित पोहचतं!
परवाच्या खानदेशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून चोपड्याला अ.भा. नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी म्हटलं की, ‘वेदना देणारी गोष्ट नाकारण्याचं धैर्य लेखकात असलं पाहिजे.’
आणिबाणीच्या काळात झालेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होताना स्व.दुर्गा भागवत आदींनी साहित्य संमेलनात केलेला तत्संबंधी विरोध आठवला आणि कला कुणाची बटीक नसते या त्यांच्या म्हणण्याला पुष्टी मिळाली.
श्रोत्यांसह नवीन लेखकांचा उत्साह, जोम वाढवणारी, नेमकी दिशा देणारी ठाम वक्यव्ये हवीच. त्याचवेळी प्रादेशिक साहित्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी समग्रतेचं भान ठेवत कौटुंबिक जिव्हाळ्यात लेखनविषय अडकू देऊ नका, हा ज्येष्ठपणाचा सुयोग्य सल्ला दिला. प्रमुख अतिथी डॉ.केशव देशमुख यांनी सांस्कृतिक अभिसरणासाठी अशा संमेलनांची आवश्यकता असल्याचे सांगून लेखक जनते- सोबत असेल तरच जनता लेखकासोबत असते,हे पटवले. शेवटी साहित्यातून माणूस वगळता येत नाही हेच खरे!
‘बोली भाषांचे मराठीला योगदान’ शीर्षकांतर्गत परिसंवादात महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह प्रा.वि.दा. पिंगळेंनी बोलीभाषा टिकवायची असेल तर तिच्याबद्दल जिव्हाळा हवा, केवळ अनुदान नाही, असे मत मांडल,े तर डॉ.मिलिंद बागुल यांनी अभिजन भाषेचा न्यूनगंड सोडून आपल्याला ओळख देणा-या बोलीभाषेतच संवाद साधावा, असा सल्ला दिला आणि अशोक सोनवणे यांनी बोलीभाषांना हीन लेखण्याने मराठीचीच हानी होते, हा भाषिक दहशतवाद असल्याचा निवार्ळा दिला.
तात्पर्य- वैचारिक मंथनातून रसिकांसह श्रोत्यांमधील लेखकांचा साहित्यिक पिंडही जोपासला जाणे महत्त्वाचेच! म्हणून अशा लहान लहान साहित्य संमेलनांची गरज नक्की आहे.
विचारसंपन्न होण्यासाठी, लेखक-कवींना आपली लेखन दिशा तपासण्यासाठी, वेळोवेळी ही संमेलने भाषा संवर्धनास्तव हवीच हवीत. प्रसंगी उत्तम लेखनाच्या पाठपुराव्यासाठी, पाठिंब्यासाठी, प्रोत्साहन हेतू अशी संमेलने म्हणजे प्रतिभेची उर्जास्त्रोतच!!
ही सारी साहित्य संमेलने तर आयोजकांच्या प्रयत्नांची फलश्रुतीच असतात. अर्थप्राप्तीची साधने नसतात. साधन दाते, शासन, सामाजिक संस्था आदींनी संमेलन आयोजकांच्या पाठीशी नक्कीच उभं राहायला हवंय. लोकशाही आणि संस्कृती यांच्या उत्थानासाठी होणारे हे कलाप्रधान प्रयोग एका अर्थाने ज्ञानयज्ञच तर असतात. तरीही पदरमोड न करताही केवळ उपस्थिती, अशा संमेलनांना न देणे हे भणंगपण कैकदा बघायला मिळाले. सुशिक्षित जाऊ दे, पण मराठीचे अध्यापकही संमेलनांकडे फिरकत नाहीत याची खंत वाटते. त्यांना हा रिकाम टेकड्यांचा उद्योग वाटत असेल, तर इलाजच खुंटला! असो.
समाज चिंतन, भाषा चिंतन, वाचन संस्कृतीची भलावण जोपासणाºया या संमेलनांमधून मनाची, लेखणीची जी सुदृढ बांधणी होते, ती वृद्धींगत होवो!
हृदयात रसिकतेने जपलेला ओलावा साहित्यासाठी राखून ठेऊ या. प्रतिभेची ही सुखद उर्जा स्थाने बळकट करण्यासाठी...
अशोक नीळकंठ सोनवणे, चोपडा