साहित्य जगायला शिकविते, दु:ख कागदावर मांडल तर मन हलकं होत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:32 PM2019-10-07T12:32:29+5:302019-10-07T12:33:25+5:30
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नवनाथ गोरे : ‘फेसाटी’ने आपुलकीची माणसं दिली, चिंतन, वाचन आणि निरीक्षण असले तर तुमचे लिखाण सर्वोत्कृष्ट
आनंद सुरवाडे
जळगाव : साहित्य हे जगायला शिकविते, दु:ख हे कागदावर मांडल तर मन हलक होतं, तुम्ही मोकळे होतात़ ‘फेसाटी’मुळे या सर्व गोष्टी अनुभवायला मिळाल्या व आपुलकीची माणसं भेटत गेली, असे सांगत लवकरच आणखी एक उत्कृष्ट कादंबरी घेऊन येणार असल्याची माहिती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’कर नवनाथ गोरे यांनी दिली़ जळगावात आला असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
प्रश्न - फेसाटी कादंबरीने आयुष्य किती बदललं ?
नवनाथ गोरे- विद्यार्थी दशेपासून जगण्याची धडपड सुरू होती़ एटीएमवर जॉब केला़ गवंडी काम केले़ उपसमारीचे चटके सहन केले़ आई वडीलांना नेहमी वाटायचे मुलगा शिकावा व सरकारी नोकरी मिळावी, मात्र शिक्षणाचे वातावारण नसल्याने शाळेत कधी चित्त लागले नाही़ पडत-धडपडत बारावी, पदवी घेतली़
लिहिण्याची सवय जडली...
मात्र, आजुबाजूचं आयुष्य, दुष्काळाचे चटके, ते सहन करून जगणारी माणसं हे सर्व वास्तव अगदी भयावह होतं़ लिहिण्याची सवय जडल्यापासून छोट्या छोट्या कथा लिहित असताना हे वास्तव कागदावर उतरविण्याचे ठरविले व ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने ते कागदावर बोलीभाषेतच मांडले़ एमएच्या द्वितीय वर्षाला असताना २०१३ मध्ये फेसाटी कादंबरी लिहून पूर्ण झाली़
ती रणधीर शिंदे यांच्याकडे घेऊन गेलो, प्रकाशकांकडे पाठविली़ मात्र, कोणाचेही उत्तर येत नव्हते़ अखेर २५ आॅगस्ट २०१७ मध्ये साहित्य संस्कृती मंडळाने ती प्रकाशित केली़ या कादंबरीला जवळपास ३० पुरस्कार मिळाले व २२ जून २०१८ रोजी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला़
आणि ओळख मिळाली
त्यानंतर एक ओळख मिळाली़ आपुलकीची माणसं मिळाली व आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले व लिहिण्याची एक उमेद, एक नवा आत्मविश्वास मिळाला़
वाचनापासून लोक दूर जात आहेत का?
अस वाटतं नाही़ तुम्ही वाचकांच्या हाती काही उत्कृष्ट दिलं तर ते वाचतातच, लेखक बनायचं असेल तर आधी वाचक व्हावे लागते. तुमच लिखाण हे कुणाच्या प्रभावाखाली नको व बनावटी नको, वास्तव, प्रामाणिकपणा हा असला तर ते वाचायला भरपूर वाचक आहेत़ माध्यमं बदलली आहेत, वाचन संस्कृतीला चांगले दिवस आहेत़ नव लेखकांनी महाविद्यालयाच्या व्यासपीठाचा आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी पुरेपूर उपयोग करावा, गाव, शहर हा भेद राहिलेला नाही़ लिहितांना दूरदृष्टी, सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही दृष्टीकोनातून कुठल्याही घटनेला प्रसंग पाहण्याचा दृष्टीकोन हवा. चिंतन, निरीक्षण, वाचन असलं तर तुमचं लिखाण उत्कृष्ट होतचं.
पुरस्कार मिळाल्यानंतर लिखाणात काय बदल हवा ?
पुरस्काराची कल्पना नव्हती़ जे होतं ते बोलीभाषेत मांडले, ते वाचकांनी स्वीकारले. मात्र, एखादी चांगली कलाकृती समोर ठेवल्यानंतर सहाजिकच तुमच्याकडून अपेक्षा वाढतात व तुमची जबादारीही. फेसाटीनंतर एक मॅच्युरिटी आली़ मात्र, फेसाटीनंतर खरे विषय सुरू झाले आहेत़ फेसाटी लिहून संपलेले नाही, मी जोपर्यंत आहे, तो पर्यंत प्रश्न संपणार नाही, रोज काहीना काही घडत असते. त्यामुळे लिहीत राहणार, विचार मांडत राहणाऱ एका चित्रपटाची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यावर काम होणार आहे़