जळगाव: काळाचा दुर्दैवी झोका! विटांचा बीम अंगावर कोसळून चिमुरडीचा झोक्यातच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 04:19 PM2022-06-19T16:19:15+5:302022-06-19T16:20:07+5:30
झोका खेळत असताना अंगावर विटांचा बीम कोसळल्याने चिमुरडीचा झोक्यातच मृत्यू झाला.
जळगाव/लोकमत न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील सावदा प्र.चा. या गावात एक दुर्दैवी घटना घडलीये. झोका खेळत असताना अंगावर विटांचा बीम कोसळल्याने चिमुरडीचा झोक्यातच मृत्यू झालाय. या घटनेत दोन बालकांना देखील दुखापत झालीये. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, विटांच्या बीमला साडीचा झोका बांधलेला होता. तीन बालके झोका खेळत असताना अचानक विटांचा बीम कोसळला. त्यात एक बालिका बीम खाली दबली गेली, डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झालाय.
अर्चना धनसिंग पावरा (वय 1 वर्ष, रा. सावदा प्र. चा., ता. एरंडोल) असं या घटनेत मृत्यू झालेल्या बालिकेचं नाव आहे. या दुर्दैवी घटनेत मयत अर्चना हिचा भाऊ प्रेम धनसिंग पावरा (वय 3 वर्षे) आणि त्यांच्या शेजारी राहणारी रमा पावरा (वय 9 वर्षे) हे दोघे जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकी काय आहे घटना?
धनसिंग शीला पावरा हे सावदा प्र.चा. या गावात गेल्या काही वर्षांपासून आपल्या कुटुंबीयांसोबत राहत आहात. शेतमजुरीची कामे करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी ते आपल्या पत्नीसोबत नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. त्यांची आई आणि दोन्ही मुले घरीच होते. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धनसिंग यांची मुलगी अर्चना आणि मुलगा प्रेम हे शेजारी राहणाऱ्या रमा सोबत घरासमोर झोका खेळत होते. धनसिंग यांच्या घराजवळ विटांच्या बीमला साडीचा झोका बांधलेला होता. तिन्ही बालके झोका खेळत असताना अचानक विटांचा बीम कोसळला. त्यात झोक्यात असलेली अर्चना ही बीमखाली दाबली गेली. तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला, तर प्रेम आणि रमा जखमी झाली. या घटनेनंतर जखमी प्रेम आणि रमाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेमुळं परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.