कलावंतांच्या नशिबात तुटपुंजी मदत, पण ती देखील उशिरानेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:15 AM2021-02-12T04:15:38+5:302021-02-12T04:15:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंत आणि साहित्यिकांच्या पदरी सरकारकडून उपेक्षाच पडत आहे. या कलावंतांना राज्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंत आणि साहित्यिकांच्या पदरी सरकारकडून उपेक्षाच पडत आहे. या कलावंतांना राज्याच्या सांस्कृतिक संचलनालयातर्फे मानधन दिले जाते. मात्र हे तुटपुंजे मानधन देखील दोन ते तीन महिने उशिराने मिळत आहे. त्यासाठी हे कलावंत अनेकदा मानधन कधी मिळेल, याची वाट पाहत असतात.
राज्य शासनाकडून दिले जाणारे हे मानधन डीबीटीद्वारे थेट कलावंतांच्या बँक खात्यात टाकले जाते. त्यात अ वर्ग, ब वर्ग आणि क वर्ग करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांना मानधन दिले जाते. अ वर्गात राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त कलावंतांना मानधन दिले जाते. ब वर्गात राज्यस्तरावर आणि क वर्गात जिल्हास्तरावर सादरीकरण करणाऱ्या कलावंत आणि साहित्यिकांना हे अनुदान दिले जाते.
मात्र ही तुटपुंजी रक्कम देखील वेळेवर देणे शासनाला सध्या जमत नाही. हे मानधनदेखील सातत्याने उशिराने दिले जात आहे. या मिळणाऱ्या रकमेत बहुतेक कलावंतांचा महिनाभराचा औषधाचा खर्च देखील निघत नाही. त्यामुळे कलावंत मेटाकुटीला आले आहे. त्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी इतर कामे देखील करावी लागत आहेत. त्यामुळे या मानधनात वाढ करून मिळावी,अशी मागणी देखील कलावंत करीत आहेत.
कोट - जिल्ह्यात एकुण ८९७ कलावंत आहेत. त्यांना मानधन दिले जाते. पालकमंत्र्यांच्या समितीकडून आलेली कलावंतांची यादी आम्ही जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सांस्कृतीक कार्य संचलनालयाला पाठवतो. त्यांना शासनाकडून डीबीटी मार्फत अनुदान वितरीत केले जाते
- विजय रायसिंग, समाज कल्याण अधिकारी
सध्या दिली जाणारी मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. ही मदत शासनाने वाढवून द्यावी. सध्या महागाई गगनाला भिडली आहे. तसेच कलावंतांना वेळेवर मदत पुरविण्यात यावी. मदत वेळेत दिली जात नसल्याने कलावंतांना अडचणींना समोरे जावे लागत आहे.
- शिवाजीराव पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र शाहीर परिषद, जळगाव शाखा
आकडेवारी
राष्ट्रीय कलावंत ४
राज्यस्तरीय कलावंत ३
जिल्हास्तरीय कलावंत ८९०
मानधन किती
रुपये प्रति माह
राष्ट्रीय पातळीवरील कलाकार २१००
राज्य पातळीवरील कलाकार १८००
जिल्हा पातळीवरील कलाकार १५००