राहतात जळगावला; लायसन्स काढले परदेशाचे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:12 AM2021-07-09T04:12:40+5:302021-07-09T04:12:40+5:30
स्टार : ८९६ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मात्र, सध्या शिक्षण, नोकरी, उद्योग किंवा ...
स्टार : ८९६
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मात्र, सध्या शिक्षण, नोकरी, उद्योग किंवा व्यवसायामुळे परदेशात गेलेल्या ४९५ जणांनी दहा वर्षांत इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढलेले आहेत. जळगाव आरटीओ कार्यालयातून हे लायसन्स वितरित झाले आहेत. लायसन्सधारकांची संख्या ४९५ असली तरी परदेशात असलेल्या भारतीयांची संख्या त्या तुलनेत खूप आहे. मात्र, जे परदेशातच स्थायिक झालेले आहेत त्यांनी तेथूनच लायसन्स काढलेले आहे. खास करून शिक्षण व नोकरीनिमित्त परदेशात गेलेले दरवर्षी हे लायसन्स नवीन काढतात. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ७ जणांनी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढलेले आहे.
शिक्षण आणि नोकरीच्या कारणामुळे अनेक व्यक्ती विदेशात जातात. यापैकी काही व्यक्ती इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओकडे सादर करतात. अवघ्या ७२ तासांत प्रकरणे निकाली काढून वाहन चालविण्याचा परवाना दिला जात आहे. त्यामुळे या व्यक्तींना परदेशातही वाहतुकीचे नियम पाळत वाहन चालविण्याची मुभा मिळाली आहे. २०१२ ते २०२१ या कालावधीत ४९५ जणांनी हे लायसन्स काढले आहे. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जायचे; पण आता शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून ऑनलाइन पद्धतीने आवेदन स्वीकारले जात आहेत. आवेदकाला कुठलीही अडचण येत असल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी त्यांना योग्य मार्गदर्शन करीत आहेत.
किती जणांनी काढले इंटरनॅशनल लर्निंग लायसन्स?
२०१२ -४१
२०१३ -४०
२०१४ -७२
२०१५ -६७
२०१६ -६८
२०१७ -६४
२०१८ -५४
२०१९ -५८
२०२० -२४
२०२१ (जूनपर्यंत) -०७
मुदत एक वर्षाचीच
परदेशातील लायसन्सची मुदत फक्त एक वर्षाची असते. दरवर्षी नूतन लायसन्स काढावे लागते. स्थानिक पातळीवर मात्र प्रथम दिलेल्या लायसन्सची मुदत २० वर्षे असते, त्यानंतर दर पाच वर्षांनी त्याचे नूतनीकरण करायचे असते. परदेशातील लायसन्सला मात्र दरवर्षी नव्यानेच प्रक्रिया करावी लागते. परदेशातील लायसन्ससाठीही काही देशांचे आरक्षण असते.
तुम्हालाही काढायचेय इंटरनॅशनल लायसन्स?
परदेशातील लायसन्स काढायचे असेल तर त्याला व्हिसा, पासपोर्ट व स्थानिक पातळीवर काढलेले मूळ लायसन्स व फोटो आदी कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारणी केली जाते. आधी काढलेल्या लायसन्सवेळी कागदपत्रे सादर केलेली असतात, त्याशिवाय चाचण्याही झालेल्या असतात, त्यामुळे ही कागदपत्रे व चाचणीची गरज नसते. वरील तीन प्रकारची कागदपत्रे त्यासाठी आवश्यक असतात.
कोट..
तुम्ही जळगावला राहत असले तरी परदेशातील लायसन्स काढता येते. त्यासाठी व्हिसा, पासपोर्ट व मूळ लायसन्स आदी कागदपत्रे लागतात. जळगाव जिल्ह्यातून अनेकांनी हे लायसन्स काढलेले आहेत.
-श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
--