खान्देशात पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:10 AM2017-08-22T01:10:29+5:302017-08-22T01:13:58+5:30
शेतकºयांना दिलासा : जळगाव तालुक्यात एक तर धुळे जिल्ह्यात नेरसह तीन ठिकाणी अतिवृष्टी, चाळीसगावला सर्वाधिक पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव/धुळे/नंदुरबार : खान्देशात जळगाव व धुळे जिल्ह्याच्या काही भागात रविवारी झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. म्हसावद (ता. जळगाव) येथे ७० तर नेर (ता. धुळे) येथे १०९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या उशिरा आलेल्या पावसामुळे कपाशी, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन आदी पिकांच्या उत्पन्नात घट होणार आहेच़
कडधान्य पिकांना मात्र याचा मोठा फटका बसत आहे़ एकतर गरज होती तेव्हा पाऊस न आल्याने उडीद, मूग ही पिके करपली व त्यातही जी आली त्यांना आता झिमझिम पावसामुळे बुरशी लागून वाया जाण्याची वेळ आली आहे़ जळगाव जिल्ह्यात रविवार २० रोजी सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. या एकाच दिवसात जिल्ह्यात एकूण ५४३ मिली मीटर पाऊस झाला.
गेल्या वर्षी ६३ तर यंदा ४८.५ टक्के पाऊस
जळगाव जिल्ह्याची पावसाची सरासरी ६६३.३ मि.मी.इतकी आहे. मागच्या वर्षी १ जून ते २१ आॅगस्ट २०१६ दरम्यान जिल्ह्यात या सरासरीच्या ६३ टक्के पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा २१ आॅगस्ट २०१७ पर्यंत ४८.५ टक्के पाऊस झाला आहे.
बोदवड तालुक्यात सर्वात कमी पाऊस
रविवार, २० रोजी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यात चाळीसगाव तालुक्या पाठोपाठ एरंडोल तालुक्यात ४९ मि.मी., जळगाव तालुक्यात ४७.८ मि.मी., रावेर तालुक्यात ४४.९ , भडगाव तालुक्यात ३९.५, अमळनेर तालुक्यात ३६.८, धरणगाव तालुक्यात ३६.९, यावल तालुक्यात ३४.८,भुसावळ तालुक्यात ३०.८, चोपडा तालुक्यात ३०.३ ,जामनेर तालुक्यात २९.९, मुक्ताईनगर तालुक्यात २२.८, बोदवड तालुक्यात १८.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
टक्केवारीत पारोळा, एरंडोल आघाडीवर
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाच्या टक्केवारीत पारोळा तालुका ६८.५ टक्क्यांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ एरंडोल तालुक्यात आतापर्यांत ६७.४ टक्के तर जळगाव तालुक्यात ५८.३ पाऊस झाला आहे. जामनेर ४१ टक्के, धरणगाव ६०.६ टक्के, भुसावळ ४२.९ टक्के, यावल ४५.२ टक्के, रावेर ५४ टक्के, मुक्ताईनगर ३४.९ टक्के, बोदवड ४०.२ टक्के, पाचोरा ४१.८ टक्के, चाळीसगाव ४८.७ टक्के, भडगाव ४०.२ टक्के, अमळनेर ३४.६ टक्के, चोपडा तालुक्यात ४९.५ टक्के इतका पाऊस झाला आहे.
गिरणा व हतनूरच्या साठ्यात वाढ
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ४८.५ टक्के पाऊस झालेला असताना जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ५२.६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरणात आजअखेरीस ४३.३७ टक्के पाणीसाठा झाला असून गिरणा धरणात ५२.४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर आजच्या स्थितीला वाघूर धरणात ६२.६६ टक्के पाणीसाठा झाला आहे.
६ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा
पावसाने रविवारी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली असली तरीही अद्यापही १३ मध्यम प्रकल्पांपैकी ६ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यात अग्नावती, हिवरा, बहुळा, भोकरबारी, बोरी व मन्याड धरणाचा समावेश आहे. तर अंजनी धरणातही केवळ २.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. सर्व १३ मध्यम प्रकल्पांपैकी ७ प्रकल्पांमध्ये एकूण २१.४० टक्के पाणीसाठा आहे. तर ९५ लघुप्रकल्पांमध्ये १०.४८ टक्के पाणीसाठा आहे.