ममुराबाद पाणी योजनेच्या रोहित्रावर शेतीपंपांचाही भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:12 AM2021-06-21T04:12:31+5:302021-06-21T04:12:31+5:30
ममुराबाद : सामूहिक पाणी योजनेला विना व्यत्यय व पुरेसा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने नांद्रा खुर्द येथे तापी काठावरील पंपिंग ...
ममुराबाद : सामूहिक पाणी योजनेला विना व्यत्यय व पुरेसा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने नांद्रा खुर्द येथे तापी काठावरील पंपिंग सेंटरनजीक एक गावठाण रोहित्र (ट्रान्सफार्मर) बसविला आहे. मात्र, महावितरणकडूनच सदर रोहित्रावरून शेतीपंपांना बेकायदेशीर जोडणी देऊन वीज पुरवठा केला जात असल्याने पाणी योजना वांध्यात सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ममुराबादसह परिसरातील गावांसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या सामूहिक पाणी योजनेसाठी नांद्रा खुर्द येथे तापी नदीच्या काठावर विहिरीची व्यवस्था आहे. त्याठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी एकावेळी दोन सबमर्सिबल बसविण्याची सोयसुद्धा आहे. प्रत्यक्षात कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे एकही पंप सुरळीतपणे चालत नसल्याने भर पावसाळ्यात पाणीपुरवठा ठप्प होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. महावितरणने मात्र तसा काही प्रकार नसल्याचे स्पष्टीकरण देऊन अंगावरचे घोंगडे झटकण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तुस्थिती लक्षात घेता महावितरणने पंपिंग सेंटरसाठी बसविलेल्या गावठाण रोहित्रावरून तापीनदीच्या पाण्याचा उपसा करणाऱ्या काही शेतीपंपांना वीज जोडणी देऊन ठेवली आहे. संबंधितांकडून त्या माध्यमातून दिवस-रात्र पंप चालविले जात असताना पाणी योजनेच्या पंपाला खूपच कमी दाबाची वीज मिळत आहे. पर्यायाने पंप जळण्यासह केबल जळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यात सातत्याने व्यत्यय तर येतच आहे, पंप दुरूस्तीचा खर्च ग्रामपंचायतीला वारंवार करावा लागत आहे. महावितरणने पंपिंग सेंटरसाठी स्वतंत्र रोहित्राद्वारे वीज पुरवठा करून पाणी योजनेची समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.
----------------
ममुराबाद पाणी योजनेसाठी नांद्रा खुर्द येथे बसविलेल्या स्वतंत्र गावठाण रोहित्राद्वारे शेतीपंपांना वीज पुरवठा करणे बेकायदेशीर आहे. त्या प्रकाराची चौकशी करून शेतीपंपांची जोडणी तातडीने तोडण्याची कार्यवाही केली जाईल.
- एस. के. पाटील, उप कार्यकारी अभियंता, महावितरण
------------------------------
फोटो ओळ -
ममुराबाद सामुहिक पाणी योजनेसाठी नांद्रा खुर्द येथे तापीनदीच्या काठावरील पंपिंग सेंटरनजीक बसविलेल्या याच रोहित्रावरून महावितरणने शेतीपंपांना बेकायदेशीर वीज जोडणी दिल्याचा आरोप आहे. (जितेंद्र पाटील)