लोडशेडिंगचा ट्रेलर, खरा पिक्चर अजून बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 10:22 AM2022-04-15T10:22:08+5:302022-04-15T10:22:26+5:30
वीजपुरवठा बंद करताना प्लान लोड रिलीफ (पीएलआर) आणि इमर्जन्सी लोड रिलीफ (ईएलआर) देण्यात येतो. पण गेल्या काही दिवसांपासून ईएलआरची संख्या वाढली आहे. त्यामुळे वीज केव्हा आणि किती वेळ गायब होईल हे कळेनासे झाले आहे.
जळगाव : उन्हाळ्याच्या तोंडावर लोडशेडिंग सुरू होताच नागरिकांची झोप उडाली आहे. ग्रामीण भागात रात्रीचा त्रास वाढला आहे, तर शहरात सकाळी लवकर किंवा दिवसा वीज गायब होऊ लागली आहे. अनेकांनी या समस्येवर उतारा म्हणून तातडीने इन्व्हर्टर बसवले पण त्यामुळे आता त्यांच्या दर महिन्याच्या वीज बिलात देखील वाढ होणार आहे. जेवढे बिल वाढेल त्या तुलनेत नंतर सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात अघोषित लोडशेडिंग सुरू झाले आहे. जळगाव शहरात महावितरणचे एकूण ३७ फिडर (वीज वाहिन्या) आहेत. त्यापैकी २० फिडरवर ६० टक्क्यांपेक्षा जास्त वीज गळती होत आहे. उरलेल्या १७ फिडरवर गळती आहेच. राज्यात उन्हामुळे विजेची मागणी वाढली आहे. १३ एप्रिल २०२२ रोजी, राज्याची एकूण मागणी २४ हजार ६०८ मेगा वॉटची, तर उपलब्धता २२ हजार ३१५ मेगा वॉट होती. या दोघांतील तूट (शॉर्टफॉल) २ हजार २९३ मेगा वॉट होता. ही तूट भरून काढण्यासाठी अघोषित भारनियमन केले जात आहे.
वीजपुरवठा बंद करताना प्लान लोड रिलीफ (पीएलआर) आणि इमर्जन्सी लोड रिलीफ (ईएलआर) देण्यात येतो. पण गेल्या काही दिवसांपासून ईएलआरची संख्या वाढली आहे. त्यामुळे वीज केव्हा आणि किती वेळ गायब होईल हे कळेनासे झाले आहे. यामध्ये सुरुवातीला एजी फिडर, त्यानंतर गरज भासल्यास ग्रामीण भाग व सर्वात शेवटी शहरी भागातील वीजपुरवठा बंद केला जातो, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, दिवसा व रात्री केव्हाही वीजपुरवठा बंद होत असल्याने नागरिकांनी इन्व्हर्टरचे साहाय्य घेतले आहे. या उपकरणाची खरेदी एकदम वाढली आहे. त्यांचा वापर वाढला आहे पण यामुळे दर महिन्याचे वीज बिल वाढणार आहे. त्यामुळे आणखी एक वाढीव खर्च नागरिकांच्या माथी पडणार आहे.
महावितरणच्या यंत्रणेवर ताण येणार
इन्व्हर्टरची बॅटरी चार्ज होताना सुरुवातीच्या अर्ध्या तासात सर्वात जास्त वीज (करंट) खेचली जाते. असे असंख्य इन्व्हर्टर जेव्हा एकाचवेळी अशा पद्धतीने चार्ज व्हायला लागतील, तेव्हा त्याचा ताण हा महावितरणच्या यंत्रणेवर पहिल्या अर्ध्या तासात येईल, अशी माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली.
पॉवर बॅकअपची सुविधा इन्व्हर्टर देतो. त्याचा वापर होताना बॅटरीचे चार्जिंग कमी होत जाते. वीजपुरवठा पुन्हा सुरळीत होताच बॅटरीचे चार्जिंग सुरू होते. पण जेवढी वीज आपण बॅटरीमधून घेतो त्यापेक्षा अधिक वीज चार्जिंगसाठी लागत असते. इन्व्हर्टर मधून २ युनिट वीज घेतली, तर बॅटरी चार्ज होण्यास अडीच युनिट वीज लागते. त्यामुळे इन्व्हर्टरवर घरातील जेवढी वीज उपकरणे चालतील तेवढे वीज बिल वाढत जाईल. हे टाळण्यासाठी इन्व्हर्टरवर कमीत कमी वीज उपकरणे वापरणे हा उपाय आहे.
- डी. एन. पाटील, निवृत्त वीज अभियंता