कर्जबाजारी शेतकऱ्याची तापी नदीत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:43 PM2019-08-17T12:43:45+5:302019-08-17T12:44:14+5:30
तरंगताना आढळला मृतदेह
जळगाव : तालुक्यातील भोकर येथील फुलचंद ताराचंद सोनवणे (वय-६९) या कर्जबाजारी शेतकºयाने गावाजवळीलच तापी नदीत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५़३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे़ या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
फुलचंद सोनवणे हे भोकर येथे पत्नी व आई भिकूबाई यांच्यासह वास्तव्यास होते़ त्यांना सुनील आणि बापू हे दोन मुलं असून दोघे नाशिक येथे एका कंपनीत कामाला आहे़ फुलचंद यांनी गावातच सहा एकर शेती आहे़ शेती करून ते आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करित होते़ दरम्यान, डोक्यावर सोसायटीच्या साडे तीन लाख रूपयांचा कर्जाचा डोंगर असल्यामुळे ते काही दिवसांपासून मानसिक तणावात होते़ दरम्यान, गुरूवारी पत्नी नाशिक येथे मुलांकडे गेली असल्यामुळे घरी फुलचंद व त्यांच्या आई होत्या़ गुरूवारी मध्यरात्री १२़३० वाजेच्या सुमारास ते आई भिकूबाई यांना शौचास जावून येतो सांगून घराबाहेर निघाले़ त्यानंतर गावाजवळ असल्यामुळे तापी नदीत त्यांनी आत्महत्या केली़
रात्री शोधा-शोध सुरू
मुलगा फुलचंद हा अर्धा ते एक तास झाला अद्याप घरी आला नाही म्हणून जवळच राहत असलेल्या दुसरा मुलगा राघव व पुतण्या पुंडलिक यांना भिकूबाई यांनी बोलवून फुलचंद यांचा शोध घेण्यास सांगितले़ रात्रभर शोध घेतल्यानंतर राघव यांना शुक्रवारी पहाटे ५़३० वाजेच्या सुमारास फुलचंद यांचा मृतदेह तापी नदीत तरंगताना आढळून आला़ त्यांनी त्वरित मृतदेह नातेवाईकांच्या मदतीने बाहेर काढून जिल्हा रूग्णालयात नेले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती फुलचंद यांना मृत घोषित केले़ रूग्णालयात ग्रामस्थांसह नातेवाईकांची एकच गर्दी झालेली होती़ याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.