महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी लॉबिंग जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:17 AM2021-02-13T04:17:04+5:302021-02-13T04:17:04+5:30
बालाणी, डॉ.चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणेंनी घेतली महाजनांची भेट : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा महापौरांसोबतच उपमहापौरपदासाठीदेखील सत्ताधारी भाजपमध्ये ...
बालाणी, डॉ.चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणेंनी घेतली महाजनांची भेट :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा महापौरांसोबतच उपमहापौरपदासाठीदेखील सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौरपद हे महिला राखीव असल्याने नगरसेवकांनी आता उपमहापौरपदावर दावा दाखल करायला सुरुवात केली आहे. महापौरपद नाही तर उपमहापौरपदाच्या पाटीवर नाव कोरून घेण्यासाठी आता इच्छुक नगरसेवकांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली असून, भाजपचे गटनेते भगत बालाणी, डॉ.चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणे यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उपमहापौरपदासाठी अनेकजण इच्छुक असून, वेगवेगळ्या माध्यमातून इच्छुकांकडून लॉबिंग केली जात आहे. भाजपकडून आतापर्यंत मनपात पदे देताना जातीनिहाय गणित पाहूनच संधी देण्यात आली आहे. महापौरपद मराठा किंवा लेवा समाजाला दिले गेले तर त्यानुसार उपमहापौर पद निश्चित केले जाणार आहे. मराठा समाजाला महापौरपद देण्यात आले, तर अल्पसंख्याक समाजातील नगरसेवकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सिंधी, गुर्जर व मागासवर्गीय समाजातील नगरसेवकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर महापौरपद लेवा समाजातील नगरसेविकेला देण्यात आले. तर उपमहापौरपद हे मराठा समाजातील नगरसेवकाला मिळण्याची शक्यता अधिक आहे. यादृष्टीने नगरसेवकदेखील कामाला लागले आहेत. डॉ.चंद्रशेखर पाटील, भगत बालाणी व सुरेश सोनवणे यांनी नुकतीच माजी मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतंत्रपणे जाऊन भेट घेतली असून, उपमहापौरपदासाठीचा दावा केला आहे. यासह जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्याकडेही इच्छुकांनी आपला दावा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. तर काही इच्छुकांनी संघ परिवारातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन लॉबिंग सुरू केले आहे.
शनिवारी काही नगरसेवक घेणार गिरीश महाजनांची भेट
भाजपमध्ये वाढत जाणारी गटबाजी, अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपचे काही नगरसेवक शनिवारी माजी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी लेवा समाजातील दहा नगरसेवकांनी माजी मंत्र्यांची भेट घेतली होती. आता पुन्हा नगरसेवकांचा एक गट महाजनांची भेट घेणार असल्याने ही भेट घेण्याचे नेमके कारण काय? याबाबतची माहिती समोर आली नाही. मात्र, भाजपमधील अंतर्गत कलह या मागचे कारण असल्याचेही बोलले जात आहे.