आथानी कैरी तथानी कैरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 05:15 PM2019-05-07T17:15:59+5:302019-05-07T17:16:17+5:30
फागणे, ता.धुळे येथील अभ्यासक तथा मुख्याध्यापिका रत्ना पाटील यांनी अक्षय तृतीयेचा गाण्यांच्या अनुषंगाने घेतलेला आढावा.
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला खान्देशी संस्कृतीचा एक महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया. आजही ग्रामीण भागात दिवाळीपेक्षा आखाजीचा उत्साह काही औरच़ सासुरवाशीण लेक आखाजीला माहेरी येते़ याचवेळेस गौराई ही माहेरपणाला आलेली असते़ आखाजीच्या आदल्या दिवशी लेक गौराईला घ्यायला जावई शंकर येतो अन् गौराईच्या सख्या शंकराला चिडवतात, थट्टा करतात़
उंदीर मारू भरीत करू
येरे शंकर जेवाले--
आखाजीच्या दिवशी मातीची घागर भरून तिची पूजा करतात़ पुरणपोळी आम्ररस, रसोई -भात, पापड कुरडाई भाजी, सांजोरी करंजी, लाडू, खरबूज यांचा नैवेद्य दाखवून गौराई शंकराचे पूजन केले जाते़ पितरांना या जेवणाची आगारी टाकून तृप्त केलं जात़ं आजही वाडवडिलांना पुरणपोळी आंब्याच्या रसाचं जेवण दिल्याशिवाय हा स्वयंपाक केला जात नाही़
आखाजीला माहेरपणाला आलेल्या लेकीच्या उत्साहाला सीमाच नसते़ जीवाभावाच्या मैत्रिणी एकमेकींना भेटतात़ सुखदु:खाच्या गोष्टी होतात़ आखाजीला घराघरात अंगणातील झाडाला झोके बांधले जातात़ झोक्याच्या दोन सरींवर दोन मैत्रिणी बसून झोके घेत म्हणतात़
आथानी कैरी तथानी कैरी
कैरी झोका खाय व
कैरी तुटनी खडक फुटणा
जुयी जुयी पानी व्हाय वं
जुयी जुयी पानी व्हाय तठे
रतन धोबी धोय वं
रतन धोबी धोये, तठे कसाना बाजार व
रतन धोबी धोये तठे लच्छीसना बाजार व
माय माले लच्छा ली ठेवजो
बंधुना हाते दी धाडजो
बंधु मोठा सोनाना पलंग पाडू मोत्याना
माहेरी आखाजीला आलेल्या लेकीचं कौतुक करण्यात संपूर्ण घरच सज्ज झालेलं असतं़ तिला काय हवं नको ते पुरवण्यात मायमाऊली दंग झालेली असते़ संसाराचे व्याप ताप विसरून लेक सुखाचा झुल्यावर झोके घेत गात राहते़ गोराईला आठवत राहते़ सोनानी सुतसी नी पानी काढे शंकरहरी व माय केशरजंजनी
पानी काढे शंकरहरीनी तठे मन्ही गौराई न्हायली व माय केशरजंजनी
तठे मन्ही गौराई न्हायली णी पिवड्या पीतांबर नेसली व माय केशरजंजनी पिवड्या पीतांबर नेसनी आंगे कांचोळी घातली व माय केशरजंजनी आंगे कांचोळी घातली नी डोळे काजळ झिरीयिरी व माय केशरजंजनी डोळे काजळ झिरीयिरीनी कपाये कुंकुयानी चिरी व माय केशरजंजनी-- लेकीला आई हाक मारून जेवायला बोलावते- पण लेक झुला सोडायला तयार नसते. आईच्या हाकेला आवाज देत पुन्हा झुला झोका सुरू होतो़
नदी नर्मदाना मेय व माय नर्मदाना मेय तठे काय सोनाना पिपय वं माय सोनाना पिपय
त्याले काय चांदीन्या हालकड्या वं माय चांदीन्या हालकाड्या
तठे बसे गौराई नारी वं माय
बसे गौराई नारी
झोका देये शंकरहरी वं माय
देये शंकर हरी
झोका गगनले जाये माय गगनले जाये
असा हा पुढच्या आखाजीच्या झोक्याची वाट पहायला लावणारा, स्त्री शक्तीचा जागर घडवणारा, वयाचे भान विसरायला लावणारा प्रापंचिक व्यापा ताणातून सुटका करणारा सौख्याचा झोका--आखाजीचा झोका--
आते आखाजी कही जी--विचारणारा़
-रत्ना ज्ञानेश्वर पाटील, फागणे, ता.जि.धुळे