ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:59 AM2018-06-26T00:59:32+5:302018-06-26T01:00:10+5:30
भराडी : आयएसओ मानांकित शाळेला आठपैकी तीनच शिक्षक, त्यातही एक रजेवर, दुसरे बाहेर
पाळधी, ता.जामनेर, जि.जळगाव : पाळधी येथून जवळच असलेल्या भराडी येथे पुरेशा शिक्षक संख्येअभावी ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी शाळा भरण्याच्या वेळेस शाळेला कुलूप ठोकले. शाळेला आठ शिक्षकांची आवश्यकता असताना आज केवळ एकमेव शिक्षक होते. एक शिक्षक रजेवर, तर दुसरे शाळेच्या कामानिमित्त बाहेर होते. यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला.
शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या नुकत्याच बदल्या झाल्या. या शिक्षक बदलीचा मोठा फटका हा भराडी येथील शाळेला बसला आहे. ग्रामस्थांचे अतिशय प्रेम व जिव्हाळा असलेली शाळा म्हणून या शाळेचा लौकिक आहे.
सुज्ञ ग्रामस्थांचे नेहमी या शाळेकडे लक्ष असते. अशातच या वर्षी झालेल्या शिक्षक बदल्यांमध्ये येथील सहापैकी पाच शिक्षकांच्या बदल्या झाल्या. दोन शिक्षक हजर झाले. येथे पूर्वी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा होती. यावर्षी नैसर्गिक वाढीने आठवीचा वर्ग मिळाला आहे.
आठ शिक्षक हवे, मिळाले तीन
सध्या शाळेला आठ शिक्षकांची गरज असून, येथे फक्त तीनच शिक्षक आहेत. त्यापैकी एक शिक्षक किरकोळ रजेवर आहेत व एक शाळेच्या कामानिमित्त बाहेर आहेत. शाळेत आठ वर्गांसाठी फक्त एकच शिक्षक उपस्थित असल्याने ही गोष्ट पालकांच्या लक्षात आली व त्यांनी शाळेला कुलूप ठोकले. यापूर्वी शाळा सुरू झाली तेव्हाच शिक्षक संख्या कमी असल्याने येथील शाळा व्यवस्थापन समितीने व पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना तसे निवेदन दिले होते. परंतु अजूनही शिक्षक उपलब्ध झाले नाही. या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामस्थांनी अतिशय मेहनतीने शाळेचे रुपडे पालटले आहे. पुन्हा शाळेचे नाव, गावाचे नाव व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन येथे पूर्ण शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडले जाणार नाही, असा इशारा पालकांनी दिला आहे.
या सर्व प्रकारानंतर दुपारी जामनेरचे गटशिक्षणाधिकारी आदिनाथ वाडकर, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू काळे, जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रमिलाबाई पाटील व केंद्रप्रमुख विठ्ठल सावकारे यांनी घटनास्थळी शाळेला भेट दिली. त्यांनी ग्रामस्थ व पदाधिकाºयांंच्या समस्या जाणून घेतल्या. येत्या दोन दिवसात पूर्ण शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
पालक व ग्रामस्थांची उपस्थिती
या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय खोडके, सरपंच मंगलाबाई पाटील, उपसरपंच पद्माकर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पाटील, माजी उपसरपंच सत्यवान पाटील, ग्रामस्थ अनिल पाटील, कुसुमबाई पाटील, रामदास पाटील, बापू जगन पाटील, संतोष पाटील, अशोक खोडके व अनेक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.