अमळनेरात पुन्हा तीन दिवस लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 11:05 PM2021-04-01T23:05:32+5:302021-04-01T23:05:56+5:30
प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी पुन्हा शनिवार, रविवार असे दोन दिवस तर पालिकेकडून सोमवार असे तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : शहर व ग्रामीण भागात मृत्यूंचे वाढते प्रमाण पाहता, कोरोनाच्या मृतांची संख्या वाढू लागल्याने अखेर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी पुन्हा शनिवार, रविवार असे दोन दिवस तर पालिकेकडून सोमवार असे तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी जनता कर्फ्यू असणार आहे.
अमळनेर शहरासह तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी शनिवारपासून रविवारपर्यंत दोन दिवस अमळनेर नगरपालिका हद्दीतील सर्व बाजारपेठ, आठवडा बाजार बंद राहतील, किराणा दुकाने, अनावश्यक इतर सर्व दुकाने बंद राहतील, असे आदेश दिले आहेत.
अमळनेर नगरपालिका हद्दीत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन होत आहे किंवा नाही, याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक नगरपालिका यांची राहील. दरम्यान, गेल्या चार दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन झाले आहे. रिकामटेकड्या नागरिकांची विनामास्क भटकंती सुरूच होती. काहींनी धुलिवंदनही साजरे केले.
मोठ्या प्रमाणावर चाचण्या झाल्या असल्या, तरी होम क्वॉरंटाईन नागरिक रस्त्यावर दिसत आहेत. होम क्वारंटाईनच्या सूचना असल्या तरी परिणामकारक उपाययोजना न झाल्याने घरी न थांबता फेरफटका मारून येत असल्याचे चित्र आहे.
काय बंद राहणार?
किरकोळ भाजीपाला, फळ खरेदी-विक्री केंद्र बंद राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालये बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट (होम डिलीव्हरी, पार्सल वगळता) बंद राहतील. सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील. शॉपिंग मॉल्स, मार्केट, बियर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप बंद राहतील. गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील. पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणेही या काळात बंद राहतील.
काय सुरु राहणार?
या निर्बंधातून दूध विक्री केंद्र, वैद्यकीय उपचार व सेवा, मेडिकल स्टोअर्स, ॲम्ब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक यांना सूट देण्यात येत आहे.