सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडव्याच्या ‘सुवर्ण’ मुहूर्तावर लॉकडाऊनचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:42+5:302021-04-13T04:14:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधाच्या काळात सुवर्णपेढ्या बंद असल्याने सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधाच्या काळात सुवर्णपेढ्या बंद असल्याने सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण व्यवसाय ठप्प होत आहे. खरेदीचा हा सुवर्ण मूहूर्तदेखील हुकणार असून यामुळे करोडो रुपयांची उलाढाल ठप्प होण्यासह ग्राहक, व्यावसायिक कारागीर यांचाही हिरमोड होत आहे.
कोरोनामुळे गेल्या आठवड्यापासून ब्रेक द चेन लागू केली आहे. यात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे सहा दिवसांपासून सुवर्ण पेढ्या बंद आहेत. या बंदमध्ये मराठी नववर्षातील पहिला सण गुढीपाडवा येत असून या पहिल्याच सणाला सुवर्ण पेढ्या बंद राहणार असल्याने मुहूर्तावरील खरेदीदेखील हुकणार आहे.
सोने खरेदीसाठी विजयादशमी, धनत्रयोदशी, गुढीपाडवा व अक्षयतृतीया या सणांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. त्यात मराठी नववर्षाची सुरुवात असल्याने या मुहूर्तावर बहुतांश ग्राहक सोने-चांदी खरेदी करतात. यातून मोठी उलाढाल होते. मात्र गेल्या वर्षापासून कोरोना संसर्गामुळे विविध व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यात आता सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडव्याला सुवर्ण खरेदीचा मुहूर्त हुकत आहे.
या सर्वांचा परिणाम सुवर्ण व्यवसायावरदेखील होत असून महत्त्वाच्या मुहूर्तापैकी असलेल्या गुढीपाडव्याची करोडो रुपयांची उलाढाल पुन्हा एकदा ठप्प होणार आहे. याची व्यावसायिकांनाही झळ सहन करावी लागत असून या ठिकाणी काम करणाऱ्या मजूर, कारागीर यांच्यावरही परिणाम होत आहे.
सुवर्णनगरीच्या इतिहासात दीडशे वर्षात जितक्या वेळा सुवर्ण पेढ्या बंद राहिल्या नसतील त्याहून अधिक वेळा कोरोनामुळे या सुवर्ण पेढ्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
-------------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण पेढ्या बंद राहत आहे. या दिवशी सुवर्ण खरेदीला मोठे महत्त्व असून ग्राहकांचा हिरमोड होत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्णनगरी जळगावात करोडो रुपयांची उलाढाल होते. मात्र लॉकडाऊनमुळे ती ठप्प झाली आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सराफ बाजार असोसिएशन