लॉकडाऊनमुळे मासिक पाळीच्या आरोग्याकडे होतेय दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:25+5:302021-05-28T04:13:25+5:30
आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना महामारीमुळे मासिक पाळी व त्यामुळे होणारी आरोग्याची कुचंबणा प्रचंड प्रमाणात वाढली ...
आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना महामारीमुळे मासिक पाळी व त्यामुळे होणारी आरोग्याची कुचंबणा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. लॉकडाऊनमुळे महिलांवर घरगुती कामाची जबाबदारी वाढली, एकांतवासाचा अभाव यामुळे मासिक पाळीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे; मात्र या काळातील दुर्लक्ष व अस्वच्छता ही घातक ठरू शकते, अशी माहिती जीएमसीचे स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.संजय बनसोडे यांनी दिली आहे. जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवसाबाबत त्यांनी या काळात घ्यायची दक्षता, याबाबत माहिती दिली आहे.
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस २८ मे रोजी साजरा केला जातो. मासिक पाळी ही साधारणतः २८ दिवसांनी येते व रक्तस्राव सरासरी ५ दिवस असतो. त्यामुळे पाचव्या महिन्याची अठ्ठावीस तारीख म्हणजेच २८ मॆ रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. नैसर्गिक असलेल्या मासिक पाळीचे नियोजन व्यवस्थित केले तर संभाव्य आजार टाळता येतात. मासिक पाळी स्वास्थाच्या निर्बंधांचे दुष्टचक्र वैज्ञानिक संवाद साधून तोडण्याची गरज आहे. त्यासाठी संकोच न बाळगता अभिमान ठेवावा, महिलांनी खुलेपणाने बोलावे, मासिक पाळी आरोग्याविषयी दक्ष राहावे, असे आवाहनही डॉ. बनसोडे यांनी केले आहे.
लॉकडाऊनमुळे मासिक पाळी आरोग्याच्या जनजागृती अभियानाला खीळ
कोरोना व लॉकडाऊनमुळे मासिक पाळी आरोग्याच्या जनजागृती अभियानाला खीळ बसली आहे. शाळा बंद असल्याने शाळेतून दिले जाणारे सॅनिटरी पॅडदेखील आता मिळेनासे झाले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती खालावल्यानेदेखील सॅनिटरी पॅड खरेदी कमी झाली आहे. घरगुती कापड वापरण्याचे प्रमाण वाढले आहे, असे डॉ. बनसोडे यांनी म्हटले आहे.
मासिक पाळीच्या कालावधीत स्वच्छता महत्त्वाची
मासिक पाळीत स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. अस्वच्छतेमुळे मूत्र मार्ग व जननेंद्रियाचे जंतुसंसर्ग होऊ शकतात. पाळीदरम्यान नियमित आंघोळ करावी. बाह्यजननेंद्रीय कोमट पाण्याने धुवावी, साबणाचा वापर टाळावा. साबणामुळे त्या जागी असलेल्या उपायकारक व हानिकारक जीवाणूंचा असमतोल होऊ शकतो, तसेच वापरण्यात येणारी स्वच्छता साधने वारंवार बदलावी. प्रत्येक वेळेस बदलल्यानंतर हात स्वच्छ धुवावे.
आयुष्यात एका महिलेकडून १० ते १२ हजार डिस्पोजेबल साधनाचा वापर
पाळीदरम्यान वापरली जाणारी साधने दोन प्रकारची असतात तात्पुरती व पुन:उपयोगी. तात्पुरती (डिस्पोजेबल) मध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व मेन्स्ट्रुअल टॅम्पोन्स याचा समावेश होतो. याचा वापर एकदाच करता येतो. एका महिलेला तिच्या पूर्ण आयुष्यात साधारणत: १० ते १२ हजार डिस्पोजेबल साधनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अनावश्यक कचरा तयार होतो. तसेच त्याचे जैविक विघटन होण्यास शेकडो वर्ष लागतात. त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास दुर्गंधी पसरते व संसर्ग होऊ शकतेा. वापरलेले पॅड हे कागदात गुंडाळून कचराकुंडीत टाकावे. टॉयलेटमध्ये टाकू नये, त्यामुळे टॉयलेट ब्लॉक होतात. साधनाची विल्हेवाट लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावे, असे त्यांनी म्हटले आहे.