यावल तालुक्यातील हिंगोणा येथे पाण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 04:23 PM2019-05-10T16:23:18+5:302019-05-10T16:25:26+5:30
हिंगोणा गावात पाणीपुरवठा हा ४० ते ४५ दिवसांनी होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा आणला आणि कार्यालयाला कुलूप ठोकले.
रणजित भालेराव
हिंगोणा, ता.यावल, जि.जळगाव : गावात पाणीपुरवठा हा ४० ते ४५ दिवसांनी होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा आणला आणि कार्यालयाला कुलूप ठोकले. या ग्राम पंचायतीवर प्रशासक बसवावा, अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे.
सध्या मे महिना सुरू आहे. उन्हाच्या तीव्रतेत दिवसेंदिवस भरपूर वाढ आहे. परिणामी परिसरातील विहिरींच्या जलपातळीत झपाट्याने घट होत आहे. याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याअभावी केळी बाग फेकून दिली आहे तर ग्रामस्थांना पिण्याचे पाणी हे तब्बल ४० ते ४५ दिवसांनी मिळत आहे. याचाच उद्रेक म्हणून १० मे रोजी सकाळी १० वाजता गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा आणला आणि आपला संताप व्यक्त केला.
विशेष म्हणजे १० रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पाणीटंचाई निवारणासाठी विशेष मासिक सभा बोलविलेली होती. ही सभा सुरू होण्याअगोदरच गावातील महिलांचा मोर्चा धडकल्याने ग्रामविकास अधिकारी व कार्यकारी मंडळाची एकच धांदल उडाली. त्यामुळे ही सभा होऊ शकली नाही. गावापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मोर मध्यम प्रकल्पाचा गावाला काडीमात्र फायदा नाही. तसेच गावात मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत अंदाजित ४७ लाख रुपये एवढा निधी जलवाहिनीसाठी व जलकुंभासाठी त्यात ट्यूबबवेल व विहीर यांचा समावेश नसल्याने या योजनेचा गावासाठी काय फायदा? म्हणजे शासनाचे ४७ लाख हे वाया जातील, असे बोलून दाखविले.
गावात एवढे जलसंकट असतानासुद्धा कोणीतरी माथेफिरू अज्ञात इसमाने गावातील मुख्य जलवाहिनी फोडून टाकली आहे. त्यामुळे ४० ते ४५ दिवसांनी होणाºया पाणीपुरवठ्यात खंड पडला आहे. म्हणजेच जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार गावात सध्या घडत आहे, अशी संतप्त भावना या वेळी बोलून दाखविण्यात आली.
प्रतिक्रिया
गावातील पाणीटंचाई बघता तात्पुरत्या स्वरूपात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काही शेतकऱ्यांकडून त्यांच्या विहिरीचे पाणी जोडले आहे.
-आर.ई. चौधरी, ग्रामविकास अधिकारी
गावातील भीषण पाणीटंचाई बघता गावाच्या आजूबाजूच्या विहिरींची पाहणी करून यावल तहसीलदारांंना ६ मे रोजी झालेल्या बैठकीत ८ विहिरी अधिग्रहण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
-डी.एच.गवई, तलाठी, हिंगोणा
दिवसेंदिवस जलपातळीत घट होत आहे. जलपातळी ४०० ते ५०० फूट खोल गेली असल्याने गावात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी काही शेतकºयांकडून पाणी घेतले आहे. ग्रामपंचायत मालकीच्या जलस्वराज्य विहिरीत कॉम्प्रेसर टाकून पाणी प्रश्र लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.
-सत्यभामा शालिक भालेराव, सरपंच, हिंगोणा, ता.यावल