कोरपावली ग्रा.पं.कार्यालयास सदस्यांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 05:45 PM2017-12-16T17:45:14+5:302017-12-16T17:49:47+5:30
ग्रामसेवक हजर राहत नसल्याच्या कारणावरुन तालुक्यातील कोरपावली येथील तीन ग्रा.पं.सदस्यांनी शनिवारी सकाळी ग्रा.पं.कार्यालयाला कुलूप ठोकले.
आॅनलाईन लोकमत
यावल,दि.१६ : ग्रामसेवक हजर राहत नसल्याच्या कारणावरुन तालुक्यातील कोरपावली येथील तीन ग्रा.पं.सदस्यांनी शनिवारी सकाळी ग्रा.पं.कार्यालयाला कुलूप ठोकले. यामुळे खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत सदस्य जलील पटेल, सर्फराज तडवी, गफूर तडवी यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकले. याबाबत जलील पटेल यांनी सांगितले की, ग्रामसेवक नियमित येत नाहीत, शिवाय लोकांना विविध कामांसाठी लागणारे दाखले वेळेवर मिळत नाहीत. याबाबत ग्रामसेवक यांना सूचना दिल्यानंतरही ग्रामस्थांची कामे होत नाहीत, त्यामुळे संताप आहे. ग्रा.पं.कार्यालयास कुलूप ठोकले असे ते म्हणाले. गावातील समस्या सोडविण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकारी येथे येत नाहीत, तोपर्यंत ग्रा. पं.कार्यालय उघडू देणार नसल्याचा पवित्रा ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थांनी घेतला. यावेळी इस्माईल तडवी, अब्दुल तडवी, दत्तू तायडे, भिमराव इंधाटे, हमीद तडवी, इम्रान पटेल, रुबाब तडवी, अशरफ तडवी व ग्रामस्थ हजर होते. दरम्यान, ग्रामसेवक प्रवीण सपकाळे यांनी ग्रा.पं.कार्यालयाला कुलूप ठोकल्याबाबतचा अहवाल गटविकास अधिकारी यशवंत सपकाळे यांच्याकडे सादर केला आहे. ते शनिवारी जळगाव येथे बैठकीस असल्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी सांगितले.