जामठी ग्रा.पं.ला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 10:31 PM2019-12-21T22:31:20+5:302019-12-21T22:31:34+5:30
सदस्यांचा रोष । ग्रामसेवक गैरहजर असल्याने कामांचा खोळंबा
बोदवड : तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या जामठी ग्रामपंचायत कार्यालयाला उपसरपंच व सदस्यांनी शनिवारी टाळे ठेकले.
गत महिन्याभरापासून सतत दांडीमारुन गैरहजर राहत असलेले ग्रामसेवक जी. एच. राठोड यांच्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक दाखले, उतारे, मिळत नसल्याने ग्रामपंचायतचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
गेल्या काही दिवसांपासून राठोड हे ग्रामपंचायत कार्यालय येथे येत नसल्याने नागरिकांना शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच गेल्या चार महिन्यांपासून मासिक मिटिंग घेण्यात आली नसतांनाही खर्च मात्र वारेमाप होत असून गेल्या एक वर्षापासून या ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे. तेरिज पत्रक संशयास्पद असल्याचा आरोप यावेळी उप सरपंच देवीदास पाटील व सदस्यांनी केला.
त्यामुळे या सर्व कारभाराची सखोल चौकशी होईपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावत असल्याचे त्यांनी २१ रोजी जामठी ग्रामपंचायत कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदनावर येथील ग्रामपंचायत उपसरपंच देवीदास कडू पाटील, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर महाजन, विकास नारायण पाटील व नागरिकांच्या सह्या आहेत.