भोकरी जि.प.शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 04:18 PM2019-07-02T16:18:48+5:302019-07-02T16:57:19+5:30
शिक्षक संख्या अपूर्ण असल्यामुळे भोकरी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद उर्दू शाळेस मंगळवारी सकाळी दहा वाजता कुलूप ठोकले.
वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : शिक्षक संख्या अपूर्ण असल्यामुळे भोकरी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद उर्दू शाळेस मंगळवारी सकाळी दहा वाजता कुलूप ठोकले. दरम्यान, दोन शिक्षकांनी ग्रामस्थांना विनंती केल्यानंतर दुपारी एकला शाळेचे कुलूप उघडण्यात आले.
या शाळेची पटसंख्या ५९६ आहे. ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असायला हवा. त्यानुसार येथे १९ ते २० शिक्षक पाहिजेत. परंतु प्रत्यक्षात दोनच कार्यरत आहेत.
येथे मात्र दोन शिक्षक नियुक्तीवर असल्याने आपल्या पाल्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीमुळे पालक वर्ग संतप्त झाला व त्यांनी भोकरी उर्दू शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. यामुळे शाळेच्या वेळेवर आलेल्या शिक्षकांना व विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रवेशद्वाराच्या बाहेरच थांबावे लागले. जोवर शाळेच्या पटसंख्येच्या तुलनेत शिक्षक दिले जात नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
येथे पाच वर्षांपासून नियुक्तीवर असलेले सलीम यांची नुकतीच भडगाव येथे बदली झाली आहे. ग्रामस्थांनी सलीम यांना परत या शाळेवर देण्याची मागणी केली आहे. त्यांच्यासोबत रईस अजीज व जाकीर जनाब अशा आणखी दोन शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, या शाळेवर दोन शिक्षक राहिले आहेत. तसेच मागील एक वर्षापासून रईस बागवान नामक शिक्षक या शाळेला दिलेला आहे, पण सदर शिक्षक शिंदाड, ता.पाचोरा शाळेवर सेवा बजावत आहे. अशपाक शिकलकर या शिक्षकाची भोकरी उर्दू शाळेला आॅर्डर निघालेली आहे. परंतु ते अजूनही शाळेला हजर झाले नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या सर्व विषयांची गंभीरपणे नोंद घ्यावी अन्यथा आम्ही ग्रामस्थ जनआंदोलन करण्याच्या तयारीत आहोत, असेही येथे उपस्थित संतप्त पालक व ग्रामस्थ यांनी म्हटले आहे.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुक्तार गुलाब, भोकरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉ.अल्ताफ शफी, माजी पंचायत समिती सदस्य रशीद कहाकर, असलम काकर, हमीद सुलेमान, हमीद अकबर, अकील अहमद, जाफर इमाम, निगरी भाई, जाकीर लुकमान आदी ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते.
उपस्थित दोघा शिक्षकांनी विनंती केल्यानंतर अखेर दुपारी शाळेचे कुलूप उघडण्यात. नंतर शाळा पूर्ववत सुरू झाली. उद्या शिक्षक मिळाले नाही तर पुन्हा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.