टाळेबंदीने ‘शिक्षणाच्या आईचा घो!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 02:52 PM2020-04-24T14:52:35+5:302020-04-24T14:54:10+5:30
कोरोनापासून बचाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीने आपले मासिक आवर्तन नुकतेच पूर्ण केले असून याकाळात शिक्षण क्षेत्राची पूर्ण वीण उसवली गेली आहे.
जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : कोरोनापासून बचाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीने आपले मासिक आवर्तन नुकतेच पूर्ण केले असून याकाळात शिक्षण क्षेत्राची पूर्ण वीण उसवली गेली आहे. शैक्षणिक वर्षाची घडी विस्कटली आहे. इयत्ता पहिली ते आठवीसह नववी आणि अकरावीचा निकाल कसा लावयचा? याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. शासनाच्या वतीनेदेखील याबाबत अजूनही योग्य सूचना नाहीत. एकूणच गोंधळाची स्थिती आहे.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी गर्दी होणारी सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, बालकमंदिरे हे त्याचे मुख्य घटक. ऐन परीक्षेच्या काळातच शाळांमधील किलबिलाट थांबला असून नेहमी गजबजणाऱ्या शाळा, महाविद्यालयांचे प्रवेशव्दार 'कुलूपबंद' आहे.
गत एक महिन्यात शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत आणि नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना 'वरच्या' वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याच विद्यार्थ्यांचा 'निकाल' कसा लावयचा? याबाबत कुठलीही ठोस सूचना नाही. मार्गदर्शनदेखील नाही. त्यामुळे शिक्षक वर्ग संभ्रमावस्थेत आहे.
३ मेपर्यंत निकालाबाबत काहीही करू नये, अशा सूचना असल्याचे मुख्याध्यापक सांगतात. टाळेबंदी मार्चमध्ये जाहीर झाली. तिचा लंबक मेपर्यंत पुढे सरकला आहे. त्यामुळे निकाल लावायचा कधी आणि पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होणार कधी? अशा प्रश्नांची प्रश्नपत्रिकाच तयार झाली असून शासनाकडून 'उत्तरपत्रिकेची' प्रतीक्षा आहे.
आॅनलाईनचा 'फज्जा'
मराठी माध्यमातील शाळांचे शैक्षणिक वर्ष जून ते एप्रिल असते, तर सीबीएस माध्यमातील शाळांचे शैक्षणिक वर्षाची घंटा १ एप्रिल रोजी वाजते. परीक्षाच रद्द झाल्याने आणि निकाल कसा लावयाचा याविषयी संदिग्धता असल्याने मराठी माध्यमात अध्यापन करणारे शिक्षक कमालीचे गोंधळलेले आहे. त्यामुळे आॅनलाईन अभ्यासक्रम शिकवण्याचे प्रयोग कमी झाले.
केंद्रीय बोर्ड असणाºया शाळांमध्ये १ एप्रिलपासून आॅनलाईन पद्धतीने शिकवले जात आहे. मात्र ग्रामीण भागात इंटरनेटचे नेटवर्क नसणे. हा आडसर आहेच. बहुतांशी पालक व विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रक्रिया कशी करायची याची माहिती नाही. शैक्षणिक क्षेत्रातही डिजिटल शिक्षित शिक्षक मनुष्यबळ फारसे नाही. त्यामुळे आॅनलाईन अध्यापनाचा फज्जा उडाला आहे.
दहावीच्या इतिहासाच्या उत्तरपत्रिकेचे गठ्ठे पडूनच
इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा शेवटचा पेपर टाळेबंदीमुळे रद्द झाला. याअगोदर झालेल्या इतिहासाच्या पेपरचे गठ्ठे भूगोलाच्या उत्तरपत्रिकांसोबत पाठवायचे असल्याने तालुकास्तरावर असणा-या कस्टडी रुममध्ये पडून आहे. याचा थेट परिणाम दहावीच्या निकालावरही होणार आहे.
६ लाख २२ हजार विद्यार्थी
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा आकारिक मुल्यमापनानुसारच होईल. मात्र याबाबत स्पष्ट सूचना नाहीत. विद्यार्थ्यांना 'वरच्या' वर्गात पाठविण्याचे शासनाने निर्देशित केले आहे. यानुसार जिल्ह्यातील सहा लाख २२ हजार ६६९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील इयत्तेत जातील.
टाळेबंदीमुळे एकूणच गोंधळाची स्थिती आहे. निकालाबाबत स्पष्ट मार्गदर्शन नाही. नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याविषयीदेखील तर्कवितर्क आहे. इंटरनेट उपलब्धता पाहता आॅनलाईन अध्यापनाचे प्रयोग फारसे यशस्वी झाले नाहीत. एकावेळी ७० ते ८० विद्यार्थी आॅनलाईन होणे शक्य नाही. त्यामुळे शासनाच्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा शिक्षण क्षेत्रातील सर्वांना आहे.
- डॅनियल दाखले
मुख्याध्यापक, गुड शेफर्ड विद्यालय, चाळीसगाव.