बोदवड पंचायत समितीला सत्ताधारी भाजपाने ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 05:03 PM2018-09-12T17:03:08+5:302018-09-12T17:04:03+5:30
गटविकास अधिकारी येत नसल्याने व नागरिकांचे काम खोळंबत असल्याचे संताप
बोदवड, जि.जळगाव : गटविकास अधिकारी येत नसल्याने जनतेची कामे खोळंबली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजपाच्या पंचायत समिती सभापती गणेश पाटील यांच्यासह सदस्यांनी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले.
तालुक्यातील ५२ खेड्यांचा कारभार पाहणाऱ्या बोदवड पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी येत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबत आहेत. तसेच अनेकांचे रोजगार हमी योजनेंतर्गत अनुदान लटकलेले आहे. नागरिकांची पायपीट होत असताना, ३९ ग्रुप ग्रामपंचायतीचा कारभार १२ ग्रामसेवकांवर चालत असहे. या समस्येबाबत जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्रव्यवहार करूनही लक्ष देत नाहीत.
बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्या वर्षा रामदास पाटील, पंचायत समिती सभापती गणेश पाटील, उपसभापती दीपाली राणे, पंचायत समिती सदस्य किशोर गायकवाड, बाजार समिती संचालक रामदास पाटील, भाजपा प्रवक्ते अनिल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष भागवत टिकारे यांनी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले.
या वेळी बोदवड पंचायत समितीच्या एकूण ४३ कर्मचाºयांपैकी १८ जागा रिक्त आहेत. नऊ कर्मचारी शासकीय कामासाठी बाहेरगावी होते, एक कर्मचारी रजेवर होता, तर गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे हे वैद्यकीय रजेवर होते, आज १७ कर्मचारी हजर होते.
गटविकास अधिकारी सात दिवसांपासून रजेवर
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ६ सप्टेंबरपासून वैद्यकीय रजेवर आहेत. यामुळे याबाबत त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही, तर सभापती गणेश पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता पंचायत समितीच्या एक अभियंत्याच्या गैरकारभाराबाबत तक्रार दिली आहे. तसेच गटविकास अधिकारी येत नसल्याने पत्रही पाठवले असून दोन्ही पत्रांची दखल घेतली जात नसल्याने व नागरिकांची कामे होत नसल्याने आज पंचायत समितीला कुलूप ठोकले.
याबाबत कार्यालय अधीक्षक दिनेश झोपे यांची प्रतिक्रिया घेतली असता आम्ही हजर आहेत, पण इतर वरिष्ठ अधिकारी येत नसल्याने तुमच्यावर रोष असल्याने कुलूप ठोकल्याचे सांगितले.