लोकअदालत मोबाइल व्हॅनचा जामनेरला शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:01 PM2019-09-17T22:01:20+5:302019-09-17T22:05:08+5:30
फिरत्या लोकअदालत योजनेंतर्गत सोमवारी बेटावद बुद्रूक, ता.जामनेर येथे शिबिर घेण्यात आले.
जामनेर, जि.जळगाव : फिरत्या लोकअदालत योजनेंतर्गत सोमवारी बेटावद बुद्रूक, ता.जामनेर येथे शिबिर घेण्यात आले. यात अकरापैकी चार प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्ह्यात मोबाइल व्हॅनचा शुभारंभ जामनेर येथून झाल. विधी सेवा समितीचे सदस्य न्यायाधीश एच.के.ठोंबरे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.
विधी सेवा समितीचे तालुकाध्यक्ष न्यायाधीश एम. चितळे, सहदिवाणी न्यायाधीश एस.सी. हवेलीकर, ए. ए. कुलकर्णी, ज्येष्ठ वकील अरुण पाटील, सरकारी वकील अनिल सारस्वत, व्ही.ए.चौधरी, पी.जी.शुक्ला, एस.एस. शुक्ला, विजय मोरे आदी उपस्थित होते.
बेटावद बुद्रूक येथे झालेल्या शिबिरात न्यायाधीश एम.एम. चितळे यांनी सांगितले की, पूर्वी गावपातळीवर गावपंचायत गावातील वादविवाद सामोपचाराने मिरवीत असे. याच धर्तीवर लोकअदालतीचे काम होत आहे. यातून पैसे व वेळेची बचत होते व आपापसातील दुरावा दूर होतो.
वकील संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, विकास चौधरी यांच्यासह सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. व्ही.ए. चौधरी यांनी केले. आभार डी.व्ही.राजपूत यांनी मानले.