Lok Sabha Election 2019 : बारामतीची जागा पाडली तर पुस्तक लिहावे लागेल - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 01:01 PM2019-04-16T13:01:21+5:302019-04-16T13:02:11+5:30
मतदान कमी झाल्यास भाजपाला धोक्याची घंटा
भुसावळ, जि. जळगाव : भाजपा -शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी वातावरण चांगले आहे. मात्र कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या दिवशी मतदारांना बाहेर काढून मतदानाची टक्केवारी वाढवून घ्यावी, असे आवाहन महसूल व कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मतदानाची टक्केवारी कमी झाली तर भाजपाला फटका बसणार असून ती धोक्याची घंटा ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचार कार्यालयामध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. प्रसंगी आमदार संजय सावकारे , नगराध्यक्ष रमण भोळे, आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, नगरसेवक मनोज बियाणी, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी नगरसेवक निर्मल कोठारी, प्रमोद सावकारे, शिवसेनेचे नगरसेवक मुकेश गुंजाळ , दीपक धांडे, हेमंत खंबायत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्यावर पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मी त्या मतदारसंघात लक्ष घालावे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मला सांगितले. मात्र जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे मी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
यावल येथेही बैठक
यावल येथे नेवे मंगल कार्यालयात तसेच भडगाव येथेही पालकमंत्री पाटील यांनी बैठक घेतली.
बारामतीसारखा प्रचार करा
जळगाव येथील सभेत पालकमंत्री म्हणाले की, सध्या आपण बारामतीवर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. तिथे जोमाने प्रचार सुरू आहे, बारामतीची जागा जर आपण पाडली तर आपण काय काय केले यासंदर्भात पुस्तक लिहावे लागेल, असे सांगत कार्यकर्त्यांनी तसा प्रचार प्रसार जळगावातही करावा, असे आवाहन केले़ पाटील यांनी भडगाव येथेही बैठक घेतली. माध्यमांच्या सर्व्हेंनुसार आपणच निवडून येऊ म्हणून झोपून राहू नका़ मतदानाची टक्केवारी कमी झाली तर भाजपासाठी ती धोक्याची घंटा ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.