Lok Sabha Election 2019 : निवडणूक खर्चासंदर्भात रक्षा खडसे, डॉ. उल्हास पाटील यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:53 AM2019-04-19T11:53:11+5:302019-04-19T11:54:15+5:30
खर्चात तफावत
जळगाव : निवडणूक खर्च सादर न केल्याने निरीक्षण नोंदवही व उमेदवाराची दैनंदिन नोंद वही यातील खर्चात तफावत येत असल्याने रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार रक्षा खडसे व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी नोटीस बजावली असून संबधितांना आपले म्हणणे सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना रावेर मतदार संघात पुन्हा दोन जणांनी पूर्ण निवडणूक खर्च सादर न केल्याने दोघांना नोटीस बजावल्या आहेत.
रक्षा खडसे यांच्या दैनंदिन नोंद वहीतील खर्च व निरीक्षण नोंदवहीतील खर्च यामध्ये सात लाख ८३ हजार १३२ रुपयांची तफावत येत आहे. त्यामुळे या खर्चाबाबत दोन दिवसात खुलासा सादर करावा, अशी नोटीस बजावली आहे.
अशाच प्रकारे डॉ. उल्हास पाटील यांच्या दैनंदिन नोंद वहीतील खर्च व निरीक्षण नोंदवहीतील खर्च यामध्ये ४० हजार २५५ रुपयांची तफावत येत आहे. त्यामुळे या खर्चाबाबत दोन दिवसात खुलासा सादर करावा, अशी नोटीस बजावली आहे.
दोन दिवसात खुलासा सादर न केल्यास कार्यवाहीस पात्र राहाल, असाही इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
यापूर्वी १४ एप्रिल रोजीदेखील निवडणूक खर्चासंदर्भात दोघांना नोटीस देण्यात आल्या होत्या.