Lok Sabha Election 2019 : अंघोळ न करता लागले पालकमंत्री प्रचाराला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:41 PM2019-04-16T12:41:01+5:302019-04-16T12:43:02+5:30
रेल्वेला पाच तास झाला उशीर
जळगाव : पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज भाजपच्या दोनही उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्हा दौऱ्यावर होते़ मात्र, रेल्वेला उशिर झाल्याने ते अंघोळ न करता आल्यापासून थेट प्रचाराला लागले होते़ यावल-जळगाव- भडगाव असा त्यांचा दौरा होता़
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्र एक्स्प्रेसने सकाळी साडेआठच्या सुमारास जळगावात पोहोचणे अपेक्षित होते़ मात्र, ही गाडी आज थेट पाच तास विलंबाने आली़ त्यामुळे प्रचाराचे केलेले नियोजन कोलमडू नये आणि कार्यकर्ते नाराज होऊ नये, यासाठी त्यांनी आल्या आल्या अंघोळ न करता थेट भुसावळ गाठले. नंतर यावल येथे दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास बैठकीसाठी गेले. येथे सुमारे अर्धा तास थांबून त्यांनी तत्काळ जळगाव गाठले़
भाजपातर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवार उशिरा घोषित झाला़ त्यातच घोषित झालेला उमेदवार बदलविण्यात आला़ यात बराच कालावधी गेला़ त्यामुळे प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने वरिष्ठांना धावपळ करावी, लागत असल्याचे चित्र आहे़ उमेदवाराची घोषणा उशिरा झाल्याचे स्वत: पाटील यांनी जळगावच्या बैठकीत मान्य केले़ विजय सहजा -सहजी मिळत नाही, त्यासाठी रक्त आटवावे लागते हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
आंघोळ करून भडगावकडे..
जळगावात साडेचारच्या सुमारास आल्यानंतर साडेपाच पर्यंत त्यांनी सराफ असोसिएशनची बैठक घेत सरकारच्या कामाची जंत्री मांडली. यानंतर ते आंघोळीसाठी शहरातील एका हॉटेलवर पोहचले. नंतर मग भडगावकडे रवाना झाले.