Lok Sabha Election 2019 : मुद्दे पे चर्चा : शंभर कोटींची घोषणा कामांची मात्र प्रतीक्षा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:04 PM2019-04-18T12:04:53+5:302019-04-18T12:06:13+5:30

जनतेच्या जिव्हाळ््याच्या विषयाचा लोकमतने घेतलेला आढावा

Lok Sabha Election 2019: Issue Discussion: Announcement of 100 crores but wait for work only | Lok Sabha Election 2019 : मुद्दे पे चर्चा : शंभर कोटींची घोषणा कामांची मात्र प्रतीक्षा..

Lok Sabha Election 2019 : मुद्दे पे चर्चा : शंभर कोटींची घोषणा कामांची मात्र प्रतीक्षा..

googlenewsNext

जळगाव : आॅगस्ट २०१८ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेचा पराभव करून पहिल्यांदाच महापालिकेत सत्ता काबीज केली. प्रचारादरम्यान शहराच्या विकासाचा मुद्दा घेवून गेल्यामुळे भाजपाला फायदा मिळाला. सत्ता मिळविल्यानंतर अवघ्या १५ दिवसात शासनाकडून शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर होवून आला. मात्र, आठ महिने होवून देखील या निधीतून होणाऱ्या कामांची प्रतीक्षा कायम आहे.
नगरोथ्थान अंतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पहिले चार महिने या निधीतून होणाºया कामांचे कोणतेही नियोजन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले नाही. जानेवारी २०१९ मध्ये महानगरपालिकेच्या महासभेत या निधीतून होणाºया कामांचे नियोजन पूर्ण करून मंजूरी देण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे अंतीम मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे.
अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेमुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. तसेच लवकरच शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरु होणार असून त्यामुळे शासनाने रस्त्यांची कामे या दोन योजना संपल्यानंतरच करण्याचा सूचना दिल्या आहेत.
अशा परिस्थितीत शहराच्या विकासासाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असताना त्यातून शहराचा विकासासाठी करण्यात येणाºया कामांचे नियोजन व्यवस्थित करणे गरजेचे आहे.
तसेच या निधीला शासनाकडून लवकरच मान्यता मिळून कामांना देखील सुरुवात झाल्यास जळगावकरांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर देता येणार आहे.
१०० कोटींचा प्रवास
१६ आॅगस्ट २०१८ रोजी नगरोथ्थान अंतर्गत मनपाला १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला. ८ आॅक्टोबर २०१८ मध्ये हा निधी खर्च करण्यासाठी मनपाच्या हिश्श्याची ३० टक्क्याची रक्कम भरण्यासाठी शासनाकडून विशेष निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर अद्यापपर्यंत मनपाला विशेष निधीबाबत कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. जानेवारी २०१९ मध्ये महासभेने १०० कोटी तून होणाºया १५८ कामांची यादी तयार करून मंजुरीसाठी बांधकाम विभागाकडे पाठवली. त्यातून १२ एप्रिल रोजी ८८ कामांना बांधकाम विभागाने मंजूरी दिली असून, अंतीम मान्यतेसाठी हा प्रस्ताव आता शासनाकडे पाठविला आहे.
दीड वर्षांपासून भुयारी गटार योजनेची प्रतीक्षा कायम
जळगाव शहरासाठी १९६ कोटी रुपयांची भुयारी गटार योजना देखील मंजूर झाली असून गेल्या दीड वर्षांपासून ही योजना निविदांच्या फेºयात अडकली होती. दरम्यान, आता नवीन तंत्रज्ञानानुसार या योजनेचे काम करण्याचा सूचना शासनाकडून देण्यात आल्या असून, मनपाकडून यासाठी निविदा काढण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. दरम्यान, या योजनेला सुरुवात एप्रिल २०१८ मध्ये होणे अपेक्षित असताना दीड वर्ष उशीर झाला आहे.
तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?
नगरोथ्थान अंतर्गत मंजूर झालेल्या निधीला शासनाकडून लवकरच मंजूरी मिळण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. तसेच ८८ कामे ही रस्त्यांची असून, पावसाळ्याआधी निविदा प्रक्रिया राबवली तर आॅगस्ट मध्ये कामांना सुरुवात होवू शकते.
या निधीतून शहरातील महत्वाची कामे मार्गी लावणे गरजेचे असून, मुख्य पाच रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्याचींही समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. गटारींच्या कामांचे प्रस्ताव मनपाने दिले असून, ही कामे रद्द करून इतर कामे यातून करायला हवीत. कारण शहरासाठी भुयारी गटार योजना मंजूर असताना गटारींचे कामे योग्य ठरणार नाहीत. यासह उद्याने विकसीत करून शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होवू शकते.

अमृत अंतर्गत शहरात कामे सुरु आहेत. सर्वच भागातील रस्ते करता येणे शक्य नसून, मुख्य पाच रस्त्यांवर भर देण्यात येणार आहे. प्रमुख रस्ते शहरातील इतर प्रश्न १०० कोटी रुपयांच्या निधीतून सोडविता येणार आहेत. शासनाकडून अंतीम मान्यता मिळाल्यानंतरच या कामांना सुरुवात होईल.
- भगत बालाणी, मनपा गटनेते, भाजपा
मनपाला पहिल्यांदाच मोठा निधी शासनाकडून मिळाला असून, या निधीतून लवकरात लवकर कामे होणे गरजेचे आहे. घोषणा होऊन अनेक महिने होवून गेले असून, प्रशासनाने तत्काळ पाठपुरावा करून शासनाकडून मंजूरी मिळवली पाहिजे. शहरातील महत्वाच्या समस्या आहे, त्या समस्यांवर निधी खर्च व्हावा.
- सुनील महाजन, मनपा विरोधी पक्षनेते

Web Title: Lok Sabha Election 2019: Issue Discussion: Announcement of 100 crores but wait for work only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.