Lok Sabha Election 2019 : जळगाव लोकसभा मतदार संघात : युती-आघाडी जोमाने लागली कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:46 PM2019-04-13T12:46:30+5:302019-04-13T12:50:39+5:30
मतदार संघातून सरळ व काट्याची लढत
चंद्रशेखर जोशी
जळगाव : लोकसभेच्या जळगाव ग्रामिण विधानसभा मतदार संघात तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत. युतीतर्फे शिवसेना व आघाडीतर्फे राष्टÑवादी कॉँग्रेस हा पक्ष या मतदार संघात प्रबळ आहे.
लोकसभा निवडणुकीत पारडे फिरवू शकतो असा मतदार संघ म्हणजे जळगाव ग्रामिण मतदार संघ आहे. २००९ पूर्वी जळगाव शहर व ग्रामिण मतदार संघ हे एकत्र होते. मात्र २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदार संघाचे विभाजन झाले. यावेळी राष्टÑवादी कॉँग्रेसचे गुलाबराव देवकर हे या मतदार संघातून विजयी झाले. २०१४ च्या निवडणुकीत या मतदार संघातून शिवसेनेने मुसंडी मारली. जळगाव तालुका व धरणगाव शहर व काही गावे या मतदार संघात येतात. सद्य स्थितीत या मतदार संघात भाजपा- शिवसेना प्रबळ आहे. जिल्हा परिषद, धरणगाव पालिका व पंचायत समिती युतीच्या ताब्यात आहे. त्यामुळे युतीचे संघटन प्रबळ आहे. २००९ च्या निवडणुकीतील यशानंतर गुलाबराव देवकर यांच्याकडे कृषि, परिवहन व पालकमंत्री अशी जबाबदारी होती. या काळात त्यांनी अनेक कामे करत संघटन वाढविले. युती-आघाडी दोघेही या मतदार संघात प्रबळ असल्यामुळे दोघेही आता जोमाने कामाला लागलेले दिसतात.
युती - प्लस पॉर्इंट काय आहेत?
ग्रामीण मतदार संघात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा होल्ड चांगला आहे. जिल्ह्यातील मुलखमैदान तोफ असा त्यांचा लौकीक आहे. प्रचार शैलीही गतिमान असल्याचा फायदा युतीला होऊ शकतो.
युती - वीक पॉर्इंट काय आहेत?
ग्रामीण मतदार संघात युतीत काही प्रमाणात बेबनाव आहे. भाजपाचे पी.सी. पाटील व गुलाबराव पाटील यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते आहे. तसेच धरणगावातही काही प्रमाणात वाद हे आहेतच.
आघाडी - प्लस पॉर्इंट काय आहेत?
२००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत गुलाबराव देवकर हे या मतदार संघातून निवडून आले होते. यावेळी त्यांना मिळालेल्या राज्यमंत्रीपदामुळे त्यांनी अनेक कामे केली व त्याचा फायदा आघाडीला होऊ शकतो.
आघाडी - वीक पॉर्इंट काय आहेत?
जळगाव तालुक्यात कॉँग्रेसचे फारसे प्रस्थ नाही. राष्टÑवादी कॉँग्रेसला एकट्याच्या ताकदीवरच येथे अवलंबून रहावे लागत आहे. ग्रामीण संघटनही फारसे बळकट नसल्याचेच लक्षात येते.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्टÑवादीचे आव्हान
हा मतदार संघ शिवसेनेचे बालेकिल्ला म्हणून परीचित होता. मात्र राष्टÑवादी कॉँग्रेसने गेल्या काही वर्षात मुसंडी मारली आहे. पक्षाची ताकद वाढली आहे.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेची युती होती. यावेळी राष्टÑवादीच्या गुलाबराव देवकर यांनी मुसंडी मारत यश मिळविले.
2014 च्या निवडणुकीत युती नव्हती. मात्र गुलाबराव पाटील यांनी येथे संघटन मजबूत करत राष्टÑवादीकडून मतदार संघ ताब्यात घेतला.
मागच्या निवडणुकीत़़़
२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती नव्हती. या निवडणुकीत गुलाबराव पाटील यांनी मुसंडी मारत राष्टÑवादीचे गुलाबराव देवकर यांचा पराभव करत बळकट स्थान निर्माण केले.
मतदार संघाची २००९ मध्ये पुनर्रचना झाली. पहिल्या निवडणुकीत राष्टÑवादीने तर २०१४ मध्ये शिवसेनेने येथे यश मिळविले.
कोणाच्या होणार सभा
युती - युतीतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच पाशा पटेल यांची सभा घेण्याचे प्रस्तावित आहे.
आघाडी - आघाडीतर्फे राष्टÑवादीच्या महिला राष्टÑीय प्रदेशाध्यक्ष फौजिया खान यांची सभा झाली.