Lok Sabha Election 2019 : निवडणूक खर्चासंदर्भात उन्मेष पाटील, गुलाबराव देवकर यांच्यासह आठ जणांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:05 PM2019-04-14T12:05:29+5:302019-04-14T12:06:41+5:30

स्मिता वाघ, आमदार सतीश पाटील यांचाही समावेश

Lok Sabha Election 2019: Notice to eight people including Unmesh Patil, Gulabrao Deokar, regarding election expenditure | Lok Sabha Election 2019 : निवडणूक खर्चासंदर्भात उन्मेष पाटील, गुलाबराव देवकर यांच्यासह आठ जणांना नोटीस

Lok Sabha Election 2019 : निवडणूक खर्चासंदर्भात उन्मेष पाटील, गुलाबराव देवकर यांच्यासह आठ जणांना नोटीस

Next

जळगाव : निवडणूक खर्च सादर न करणे, हिशेबात तफावत, झालेल्या कार्यक्रमांच्या खर्चाबाबत माहिती न देणे अशा विविध कारणांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आठ जणांना नोटीस काढल्या आहेत. यात जळगाव लोकसभा मतदार संघाचे युतीचे उमेदवार उन्मेष पाटील, आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यासह आमदार स्मिता वाघ, आमदार डॉ. सतीश पाटील यांचाही समावेश आहे. संबधितांना आपले म्हणणे सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रत्येक उमेदवाराने तसेच उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेही आपला निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना जळगाव व रावेर मतदार संघातील आठ जणांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने त्यांना शनिवारी नोटीस काढण्यात आल्या आहेत. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या सह्या झाल्या.
मंडपाचा खर्च शासकीय दरानुसार नाही
जळगाव लोकसभा मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी मंडपाचे दर सादर करताना ते शासकीय दरानुसार न दाखविता कमी दराने दाखविल्याने त्यांना नोटीस काढण्यात आली आहे. देवकर यांनी सादर केलेले दर अमान्य असल्याचे नोटीसीत म्हटले आहे.
निरीक्षण नोंदवहीनुसार नोंद नाही
जळगाव लोकसभा मतदार संघातीलच भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या खर्चासंदर्भात निरीक्षण नोंद वहीनुसार खर्चाची नोंद नसल्याने त्यांना नोटीस काढली आहे. पाटील यांच्या खर्चासंदर्भात उमेदवारांचे प्रतिनिधींनी खर्च कमी असल्याचे म्हटले असले तरी नोंदवहीमध्ये खर्च जास्त असल्याने उन्मेष पाटील यांना नोटीस काढण्यात आली आहे.
‘मै भी चौकीदार हू’चा खर्च केला कोणी
जळगाव लोकसभा मतदार संघातून प्रथम भाजपची उमेदवारी मिळालेल्या आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द होऊन अर्ज अवैध ठरला असला तरी ‘मै भी चौकीदार हू’ या कार्यक्रमाचा खर्च सादर न केल्याने वाघ यांना नोटीस काढली आहे. २८ मार्च रोजी ‘मै भी चौकीदार हू’ हा कार्यक्रम झाला होता. वाघ यांनी २९ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र २८ मार्चपूर्वीच वाघ यांची उमेदवारी जाहीर झाल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमाचा खर्च पक्षाने केला की आपण केला, याचा खुलासा सादर करण्यासंदर्भात नोटीस काढण्यात आली आहे.
बँक खात्यातून खर्च न करता रोख खर्च
जळगाव लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांनी निवडणूक खर्चासाठी बँक खाते उघडले, मात्र त्या खात्यातून खर्च न करता स्वत: जवळील रोख रक्कम खर्च केल्याने त्यांना नोटीस काढण्यात आली आहे.
उमेदवारी दाखलपासून खर्च दिला नाही
जळगाव लोकसभा मतदार संघातूनच २ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करून ८ रोजी माघार घेतलेले आमदार डॉ. सतीश पाटील व प्रदीप भिमराव मोतीराया यांनी २ ते ८ एप्रिलदरम्यानचा खर्च सादर न केल्याने त्यांना नोटीस काढून दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे सूचित केले आहे.
तपासणीस दांडी भोवली
निवडणूक लढविण्या-या उमेदवारांनी आपली निवडणूक खर्च हिशोब नोंदवही घेऊन ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च शाखेत स्वत: अथवा प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्यासंदर्भात सूचित करूनही ११ रोजी उपस्थित न राहिल्याबद्दल जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुभाष खैरनार व रुपेश संचेती यांनादेखील काढण्यात आली आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: Notice to eight people including Unmesh Patil, Gulabrao Deokar, regarding election expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.