Lok Sabha Election 2019 : निवडणूक खर्चासंदर्भात उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:42 AM2019-04-18T11:42:48+5:302019-04-18T11:47:32+5:30
संबधितांना आपले म्हणणे सादर करण्याचे सूचित करण्यात आले
जळगाव : निवडणूक खर्च सादर न करणे, हिशेबात तफावत, झालेल्या कार्यक्रमांच्या खर्चाबाबत माहिती न देणे अशा विविध कारणांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी चार जणांना नोटीस बजावल्या आहेत. यात जळगाव लोकसभा मतदार संघाचे युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांचाही समावेश आहे. संबधितांना आपले म्हणणे सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रत्येक उमेदवाराने तसेच उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेही आपला निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना जळगाव मतदार संघात पुन्हा जणांनी निवडणूक खर्च नोंद वही तपासणीस गैरहजर राहिल्याने या नोटीस बजावल्या आहेत.
उन्मेष पाटील यांच्या खर्चासंदर्भात निरीक्षण नोंद वहीनुसार खर्चाची नोंद नसल्याचे नोटिसीत म्हटले आहे. पाटील यांच्या खर्चासंदर्भात उमेदवारांचे प्रतिनिधींनी खर्च कमी असल्याचे म्हटले असले तरी नोंदवहीमध्ये खर्च जास्त असल्याने उन्मेष पाटील यांना नोटीस काढली आहे. सोबतच १५ रोजी नोंद वही तपासणीस हजर नसल्याचेही नोटीसीत म्हटले आहे.
या सोबतच याच कारणावरून राष्ट्रीय जनशक्ती पार्टीचे (सेक्यूलर) शरद गोरख भामरे (सुतार), अपक्ष उमेदवार रुपेश पारसमल संचेती, सुभाष शिवलाल खैरनार यांनाही नोटीस बजावल्या आहेत.
यापूर्वी ११ एप्रिल रोजीदेखील नोंदवही तपासणीस गैरहजर राहिल्याने नोटीस काढण्यात आल्या होत्या.