या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 07:19 IST2024-04-28T07:18:03+5:302024-04-28T07:19:01+5:30
युवराजची परिस्थिती गरिबीची असून त्याने शिक्षणाची कास धरली आहे. त्याला राजकारणाचीही आवड आहे.

या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
बिडगाव (जळगाव) : सातपुड्याच्या पायथ्याशी बढाईपाडा येथे झोपडीत राहणारा २८ वर्षीय तरुण युवराज देवसिंग बारेला याने रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, समाजबांधवांनी वर्गणी काढून त्याची डिपॉझिटची रक्कम भरली आहे. युवराज सध्या वकिलीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. बदल घडविण्यासाठी तो राजकारणात उतरल्याचे तो सांगतो.
सर्वात तरूण उमेदवार
युवराजची परिस्थिती गरिबीची असून त्याने शिक्षणाची कास धरली आहे. त्याला राजकारणाचीही आवड आहे. त्याचे गावातील चांगले संबंध पाहता बिडगाव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध सदस्य म्हणून तो निवडून आला. एकूण २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सर्वात कमी वय युवराजचे आहे.
बदलाचा ध्यास सातपुड्याच्या अगदी पायथ्याशी असलेल्या बढाईपाडा या आदिवासी पाड्यावर गवती छपराच्या झोपडीत युवराज राहतो. शिक्षण घेत असतानाच परिसराच्या विकासाचा ध्यास त्याने घेतला आहे. राजकारणातून विकास साधता येईल, या आशेतून कसलीही पार्श्वभूमी आणी आर्थिक परिस्थिती नसताना तो निवडणुकीला उभा राहिला आहे.