Lok Sabha Election 2024: भाजप प्रवेशाची भावजयीकडून आलेली ऑफर नणंदेने नाकारली; खडसेंमध्ये 'खटका'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 05:02 PM2024-04-20T17:02:11+5:302024-04-20T17:04:04+5:30
Raver Lok Sabha Constituency: रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रक्षा खडसे या मैदानात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचार करत आहेत.
जळगाव : आमदार एकनाथ खडसे हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत; परंतु त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मात्र त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातच थांबणार असल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यातच त्यांच्या वहिनी, भाजप खासदार रक्षा खडसे यांनी रोहिणी खडसे भाजपामध्ये याव्या यासाठी त्या प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते; परंतु भावजयीची 'ऑफर' नणंदेने फेटाळून लावली आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रक्षा खडसे या मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे श्रीराम पवार हे मैदानात आहेत. श्रीराम पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचार करत आहेत. अशा स्थितीत रोहिणी खडसे भाजपामध्ये याव्या, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रक्षा खडसे दोन दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. रोहिणी खडसे यांनी मात्र गुरुवारी रात्री पत्रकारांशी बोलताना, भाजप प्रवेशाची ऑफर फेटाळून लावली.
काय म्हणाल्या रक्षा खडसे ?
रोहिणी खडसे गेली काही वर्षांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी काम करत आहेत. त्यांना त्या पक्षाकडून महिला प्रदेशाध्यक्ष पददेखील मिळाले आहे; पण त्यांनी भाजपामध्ये येऊन काम करावे, अशी माझी इच्छा आहे.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे ?
रक्षा खडसे यांनी व्यक्त केलेली इच्छा ही त्यांची वैयक्तिक इच्छा आहे; पण मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातच कायम राहणार आहे. त्यांनी त्यांचे प्रयत्न करावे की नाही, ही त्यांची इच्छा आहे.
'घरवापसी'ला 'डेडलाइन' नाही!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी १५ दिवसात भारतीय जनता पक्षामध्ये परतण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याला दहा दिवस झाल्यानंतरही त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामधील अनेकांचा गोंधळ होताना दिसत आहे. खडसे यांनी मात्र त्यांच्या स्वगृही परतण्यासाठी कोणतीही 'डेडलाइन' नाही; परंतु भाजपामध्ये जाणे नक्की असल्याची भूमिका 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.
एकनाथ खडसेंनी गत ७ एप्रिल रोजी पक्षांतरासंदर्भात मौन सोडले होते. येत्या १५ दिवसांत भाजपामध्ये प्रवेश करणार, अशी माहिती त्यांनी दिली होती. ती मुदत संपत आली आहे. त्यामुळे प्रवेश नेमका होणार तरी केव्हा, अशी विचारणा 'लोकमत'ने केली असता ते म्हणाले, की १५ दिवसांत प्रवेश करणार हे ते बोलले होते; पण त्यासाठी 'डेडलाइन' वगैरे काही नाही.