'शिखर बँक घोटाळ्यासाठी अजित पवारांनी पलायन केलं, क्लिनचीटवरुन संजय राऊतांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 01:52 PM2024-04-24T13:52:04+5:302024-04-24T13:54:18+5:30
Sanjay Raut Ajit Pawar : लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २५ एप्रिल रोजी होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.
Sanjay Raut Ajit Pawar (Marathi News ) : लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २५ एप्रिल रोजी होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. दरम्यान, आज शिखर बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लिनचीट मिळाल्याची बातमी समोर आली. या प्रकरणात कोणतीही अनियमितता नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपावर निशाणा साधला आहे.
"अजित पवार यांनी भाजपासोबत पलायन या शिखर बँक घोटाळ्यासाठीच केले आहे. भाजपाचे वॉशिंग मशिन त्यासाठीच आहे, असंही संजय राऊत म्हणाले. "७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले काही दिवसापूर्वी बोलले होते. याच घोटाळ्यावर आता आरोपीला भाजपा सरकार क्लिन चीट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत हे स्पष्ट दिसत आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
"जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे असं काही नाही, भाजपाच्या लोकांनी इथल्या लोकांना फसवून विजय मिळवला आहे. संपूर्ण देशातील वातावरण बदलले आहे. राज्यातील मोदींच्या सभांना प्रतिसाद मिळत नाही, मोदी येतात कधी जातात कधी हेच कळत नाही, मोदींची हवा पूर्ण संपलेली आहे, अशी टीका राऊत यांनी मोदींवर केली.
"जळगाव, दिंडोरी, नाशिक या जागेवर महाविकास आघाडी जिंकणार आहेत. उद्याची निवडणूक संपली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व संपलेल असेल. संतुलन कोणाच बिघडले हे चार जून नंतर समजेन. गिरीश महाजन जागा ५० लाखाच्या लीडने म्हटले नाही हे बरं, या बद्दल मी त्यांच अभिनंदन करतो. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार आहेत. तिथे शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या सभा झाल्या आहेत. नवनीत राणा तीन नंबरच्या क्रमांकावर राहतील अशी मला पक्की बातमी आहे, असंही संजय राऊत म्हणाले.